प्रियकराकडून प्रेयसीचा गळा आवरून खून

लग्नाच्या तगाद्याने झाला होता त्रस्त

* आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चांदूर रेल्वे/16 ऑक्टोबर : शहर हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. डांगरीपुरा येथील तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह रेल्वे पुलाजवळ टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभम विठ्ठलराव हटवार (वय 28, रा. डांगरीपुरा, चांदूर रेल्वे) याला अटक केली असून मृतक प्रेयसीचे नाव पूजा सूरज उके (वय 25, रा. डांगरीपुरा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हटवार आणि पूजा उके यांचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये घट्ट मैत्री असून हे नाते पुढे प्रेमसंबंधात परिवर्तित झाले. दरम्यान, पूजाचे लग्न शिराळा (ता. पुसदा) येथे झाले होते, परंतु पतीच्या व्यसनाधीनतेमुळे आणि सततच्या त्रासामुळे ती माहेरी चांदूर रेल्वे येथे परत आली. तिला एका मुलीचाही जन्म झाला होता. दरम्यान, शुभमचेही लग्न झाले होते, तरीही दोघांचे संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. या काळात पूजाने शुभमवर लग्नाचा तगादा लावण्यास सुरुवात केली, ज्यामुळे शुभम मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला आणि शेवटी त्याने या नात्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. 15 ऑक्टोबर रोजी शुभमने योजनाबद्ध पद्धतीने पूजाला आपल्या घरी बोलावले. घरात झालेल्या वादानंतर त्याने पूजाचा गळा आवळून तिचा खून केला. मृतदेह लपवण्यासाठी त्याने पूजाचे प्रेत स्मशानभूमीजवळील रेल्वे पुलाजवळ नेऊन ठेवले. नंतर रेल्वे गेल्याने तिच्या शरीराचे तुकडे झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेचा उलगडा पूजाच्या भावाच्या तक्रारीवरून झाला. 15 ऑक्टोबर रोजी पूजा सकाळपासून घरी न परतल्याने तिचा भाऊ रोहित शंकर बावनथळे यांनी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना बहिणीचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि खबर्‍यांच्या मदतीने चौकशी सुरू केली. संशयित शुभमला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने कबुली दिली की पूजाने वारंवार लग्नासाठी दबाव आणल्यामुळेच त्याने तिचा खून केल्याचे स्पष्ट केले.

* चांदूर रेल्वे परिसरात एकच खळबळ उडाली

या संपूर्ण घटनेत आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या घटनेचा संपूर्ण तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजय आकरे, नंदलाल लिंगोट, रितेश आंधळे, राहुल इंगळे प्रशांत ढोके, योगेश कडुकार, अमोल घोडे, सागर पाचपोर, प्रवीण मेश्राम, रवी भुताडे तसेच यात महत्वाची भूमिका बजावणारे हेड कॉन्स्टेबल नितीन शेंडे करीत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button