दारूच्या नशेत दोन जणांनी केली आत्महत्या
कोठोड्यात वृद्धाने गळफास लावला

-तातर्यात तरुणाने विष प्राशन केले
अमरावती / 28 ऑगस्ट : अमरावती जिल्ह्यात दोन दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. दारूच्या आहारी गेलेल्या आणि नशेमध्ये बेशुद्ध अवस्थेत दोघांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोठोडा गावात एका वृद्धाने तर धारणी तालुक्यातील तातरा गावात एका तरुणाने स्वतःचे जीवन संपविले.
कोठोडा येथील भाऊराव हरिभाऊ ठवकर (60) यांनी 26 ऑगस्ट रोजी सायं. 6.15 वाजताच्या दरम्यान घराशेजारील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. भाऊराव ठवकर हे कामधंदा काहीच करत नसत. त्यांना दारूचे व्यसन जडले होते. पूर्ण दिवस नशेत राहून गावात इकडे-तिकडे भटकत असत. घटनेनंतर लोणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून तपास सुरु आहे.
दरम्यान दुसरी घटना धारणी तालुक्यातील तातरा येथे घडली. येथील हरीराम श्यामलाल ठाकरे (30) या तरुणाने 25 ऑगस्टच्या सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मद्याच्या नशेत विषारी पदार्थ प्राशन केले. उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला. याबाबत धारणी पोलिसांनी 26 ऑगस्ट रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील व्यक्तींवर होणारा मानसिक ताण व त्यातून उद्भवणार्या गंभीर घटनांकडे या दोन आत्महत्यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.




