बेपत्ता युवकाचा छत्री तलावात मृतदेह आढळला

आत्महत्या केल्याचा कयास

अमरावती / 4 जुलै: घरातून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा मृतदेह गुरुवारी सकाळी छत्री तलावात तरंगताना आढळून आला. विजय इंद्रजित इंगळे (22) असे मृतक युवकाचे नाव असून तो शहरातील केडिया नगर परिसरात असलेल्या आदिवासी नगर येथील रहिवासी होता. विजय इंगळे हा पेंटींगचा व्यवसाय करित होता. त्याने छत्री तलावात उडी घेउन आत्महत्या केली असावी, असा कयास लावण्यात येत आहे.
विजय इंगळे हा आदिवासी नगरात राहत होता. त्याच्या घराशेजारीच त्याची आई संगिता, बहिण प्रियंका आणि आजी कुसुम यासुद्धा राहतात. 1 जुलै रोजी रात्री 9 वाजता कुणाला काहीही न सांगता विजय घरातून बाहेर पडला. नंतर तो रात्रभर घरी परतलाच नाही. कुटुंबिय आणि त्याचे मामा प्रकाश कसेकणे यांनी त्याचा शोध घेतला पण तो कोठेही आढळून आला नाही. त्याने आपला मोबाईलसुद्धा बंद ठेवला होता. अशातच गुरुवारी सकाळी छत्री तलावात विजयचा मृतदेह तरंगताना दिसून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह तलावातून बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. विजयने आत्महत्या केल्याचे बोलले जात असले तरी त्यामागचे कारण स्पष्ट होउ शकले नाही. पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button