ठाणेप्रमुखांच्या बदलीचा ब्लूप्रिंट तयार, पोलीस दलात खळबळ
हल्ले, लूट, चोरी प्रकरण थांबविण्याचा पोलिसांचा प्रयत्न

अमरावती /27 नोव्हेंबर : शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात मोठ्या फेरबदलाची प्रक्रिया सुरू झाली असून ठाणेप्रमुखांच्या व्यापक बदलीचा ब्लूप्रिंट अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अलीकडच्या काळात धारदार हल्ले, लूट, चोरी आणि खुनांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कठोर भूमिका स्वीकारली आहे.
विश्वसनीय माहितीनुसार, आयुक्तांनी सर्व ठाणेप्रमुखांना स्पष्ट निर्देश दिले असून गुन्हेगारीवर पूर्ण नियंत्रण आणण्याचे आदेश जारी केले आहेत. कोण तीही ढिलाई किंवा निष्का ळजी पणा सहन केला जाणार नाही, असा कठोर इशाराही देण्यात आला आहे. गुन्हे नियंत्रण अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने अनुभवी, कणखर आणि कडक कार्यपद्धती असलेल्या अधिकार्यांची निवड सुरू झाली आहे. संवेदनशील भागांवर काटेकोर देखरेख ठेवण्यासाठी खास नियोजन केले जात असून विविध ठाण्यांतील नेतृत्व क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. या बदलांमुळे अनेक ठाणेप्रमुखांच्या बदलीची शक्यता जोर धरत आहे. पहिली बदली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे पोलीस विभागात प्रचंड हालचाल निर्माण झाली आहे.
प्रशासनाचा ठाम संदेश-पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा पुनरुच्चार केला आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाला रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व कठोर निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. अपेक्षा आहे की नव्या फेरबदलानंतर शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश बसेल .




