अकबर नगरमध्ये ‘ब्लॅक शमशेर’कडे अवैध शस्त्रसाठा
पोलिसांचा छापा, तलवारी, सत्तूर, फरसा जप्त

अमरावती / 29 जुलै : शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नागपुरी गेट पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, अकबर नगर भागात अवैध शस्त्रसाठा लपवून ठेवलेल्या ‘ब्लॅक शमशेर’चा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीकडून दोन तलवारी, तीन सत्तूर आणि एक फरसा असा जीवघेणा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांच्या गुप्त माहिती पथकाला खबर मिळाली होती की, अकबर नगरमधील फारूख खान उर्फ ब्लॅक शमशेर खान (वय 32) याच्या घरी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक उरला गोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने छापा टाकला. छाप्यादरम्यान आरोपीच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना दोन धोकादायक तलवारी, धारदार सत्तूर आणि लोखंडी फरसा आढळून आला. हे सर्व शस्त्र जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फारूख खान उर्फ ब्लॅक शमशेर याने हे शस्त्र कुठून आणले? कोणाच्या सांगण्यावरून? आणि कोणत्या उद्देशाने साठवून ठेवले होते? याचा शोध घेण्यासाठी नागपुरी गेट पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. शस्त्रसाठा कोणत्यातरी संभाव्य गुन्ह्यासाठी वापरण्याच्या तयारीत होता का, याचाही तपास केला जात आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, एसीपी अरुण पाटील, आणि पोलीस निरीक्षक उरला गोंडावार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते, डीबी पथकाचे प्रमुख अहमद अली, संतोष यादव, दानिश शेख, राहुल रोडे, सागर पंडित आणि चालक आकाश कांबळे यांनी भूमिका बजावली.




