अमरावतीत भाजपाची निवडणूक मोर्चेबांधणी मजबूत
कुटेंच्या हाती प्रभारीपद, बोंडे-पोटे-डेहनकर यांच्यावर विभागनिहाय सूत्रे

अमरावती /6 नोव्हेंबर – अमरावती जिल्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संघटनात्मक फेरबदलासह शहर व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र नेतृत्व निश्चित करत पक्षाने निवडणूक यंत्रणा अधिक आक्रमक केली आहे. यामुळे निवडणुकीत भाजपाची रणनीती आणखी स्पष्ट झाली आहे. राज्याचे मंत्री संजय कुटे यांच्याकडे अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्याचा सगळा निवडणूक प्रवास-नियोजन, बैठका, अहवाल आणि प्रचार मोहिमेचे निरीक्षण-याचे नेतृत्व कुटे स्वतः करणार असून जिल्हा पातळीवर पक्षाला मजबूत दिशा मिळाल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जारी केलेल्या नियुक्तीनुसार डॉ. अनिल बोंडे, प्रवीण पोटे-पाटील आणि जयंत डेहनकर यांना निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अमरावती महापालिकेची संपूर्ण जबाबदारी जयंत डेहनकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून शहरातील बूथरचना, प्रचार मोहीम आणि समन्वय त्यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहे. ग्रामीण भागातील नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे नियोजन डॉ. अनिल बोंडे आणि प्रवीण पोटे-पाटील यांच्या संयुक्त निरीक्षणाखाली राबवले जाणार आहे. ग्रामीण समीकरणे, स्थानिक राजकीय घडामोडी व संघटनात्मक रचना पाहता दोन्ही नेत्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तहसीलनिहाय जबाबदार्या देखील स्पष्ट करण्यात आल्या आहेत. डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे – मोर्शी, वरुड, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि भातकुली प्रवीण पोटे-पाटील यांच्याकडे – चांदुर बाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा आणि धारणी या फेरबदलांनंतर शहर-ग्रामीण बैठकींना वेग आला आहे. पक्षात उत्साह वाढल्याचे दिसून येत असून भाजपाची निवडणूक मशिनरी सज्ज झाली असल्याचे चित्र उभे राहिले आहे.




