बीजेपीच्या बिहार विजयाचा अमरावतीत भव्य जल्लोष
राजकमल चौक ढोल-ताशांनी आणि गुलालाने दणाणला

अनिल बोंडे, प्रवीण पोटे, डॉ. नितीन धांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
अमरावती / 14 नोव्हेंबर – भारतीय जनता पक्षाच्या बिहार विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर देशभर जल्लोषाचे वातावरण असून त्याची चमक अमरावतीतही पाहायला मिळाली. पक्षाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी राजकमल चौकात आज मोठ्या उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला. ढोल-ताशांच्या तालावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनसोक्त थिरकले. गुलाल उधळला गेला, मिठाया वाटण्यात आल्या आणि चौकात सतत जयजयकारांचा आवाज घुमत होता.
सकाळपासूनच कार्यकर्त्यांचा ओघ राजकमल चौकात सुरू झाला होता. चेहर्यावर गुलाल, गळ्यात कमळाचे दुपट्टे आणि हातात भाजपचे ध्वज घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होत होते. शहर जिलाध्यक्ष डॉ. नितीन धांडेंनी स्वतः ढोल वाजवून आनंद साजरा केला. चौकात वातावरण पूर्णपणे सणासुदीचे झाले होते. या जल्लोषात खासदार अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, शहर जिलाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, निवडणूक प्रभारी मंत्री डॉ. संजय कुटे, जयंत डेहनकर, महिला मोर्चा अध्यक्ष सुधा तिवारी, पूर्व अध्यक्ष किरण पातुरकर, कौशिक अग्रवाल, शिवराय कुलकर्णी, सुरेखा लुंगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे चौकात उत्साहाची लाट उसळली होती. मंचावरून भारत माता की जय, जय बीजेपी, कमलाचा विजय असाच राहू दे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गुलालाच्या उधळणीमुळे संपूर्ण चौक केशरी रंगात न्हाऊन निघाला. अनेकांनी नृत्य करून विजयाचा आनंद साजरा केला. मिठाई वाटली गेली तसेच काही कार्यकर्त्यांनी विजयानिमित्त खास कमळाच्या आकारातील केक कापला. बादल कुलकर्णी, रोहित देशमुख, मंगेश खोंडे, विवेक चुटके, लता देशमुख, संगीता बुरंगे, गंगा खारकर, राधा कुरील, युवक मोर्चा अध्यक्ष विक्की शर्मा, रवींद्र खांडेकर, सचिन रासने, मिलिंद बांबल, भूषण हरकूट, संजय नरवणे, श्रीचंद तेजवानी, अवि देउलकर, योगेश वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले. दुपारपासून संध्याकाळपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमामुळे राजकमल चौकात उत्सवमय वातावरण होते. वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली, मात्र पोलिसांनी सुयोग्य व्यवस्थापन करत परिस्थिती नियंत्रित ठेवली. बिहारमधील विजयामुळे पक्षात नवचैतन्य संचारले असून आगामी काळातही असा आत्मविश्वास कायम राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.




