भाजप सर्वात मोठा पक्ष सत्तास्थापनेसाठी अपक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
बहुमतासाठी भाजपची कसरत तर युवा स्वाभिमान आणि एमआयएमने मारली मुसंडी

* प्रस्थापित नेत्यांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड पाडत मतदारांनी नव्या चेहर्यांवर दर्शवला विश्वास
अमरावती/ 16 जानेवारी : अमरावती महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पंचवीस जागा जिंकून सभागृहातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. 87 सदस्यांच्या या महापालिकेत सत्तेचा मार्ग खडतर झाला असून, भाजप जरी अव्वल ठरला असला तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला 45 हा आकडा गाठण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालांनी अमरावतीचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून टाकले असून सत्तास्थापनेच्या चाव्या आता निर्णायक ठरणार्या इतर पक्षांच्या हातात गेल्या आहेत. या निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाने पंधरा जागांसह जोरदार मुसंडी मारली असून ते आता किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. त्यासोबतच एमआयएमने बारा जागा मिळवून आपली ताकद सिद्ध केली आहे. काँग्रेसने पंधरा जागा जिंकून आपले अस्तित्व टिकवून ठेवले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. मतदारांनी प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारून नवीन रक्ताला संधी दिल्याने महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.
निवडणुकीच्या प्रभागनिहाय निकालांकडे पाहिल्यास, प्रभाग 1 रहाटगावमध्ये भाजपच्या कल्याणी तायडे आणि वंदना मडघे यांनी विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे चंदू खेडकर आणि गुड्डू धर्माले विजयी झाले. प्रभाग 2 संत गाडगेबाबा परिसरात विनोद तानवैस आणि सुरेखा लुंगारे (भाजप) तर मिनल सवई आणि प्रमोद महल्ले (राष्ट्रवादी) यांनी बाजी मारली. प्रभाग 3 नवसारीमध्ये काँग्रेसच्या अनिता काले, प्रशांत महल्ले आणि लुबना तनवीर विजयी झाल्या, तर भाजपच्या ऋषिकेश देशमुख यांनी येथे विजय मिळवला. प्रभाग 4 जमिल कॉलनीमध्ये एमआयएमने एकतर्फी वर्चस्व गाजवत अहमद शाह, फरहानाज सई, कुबरा बानो आणि सलाउद्दीन इकरामुद्दीन यांना निवडून आणले. प्रभाग 5 महेंद्र कॉलनीतून भाजपचे सुनील लोणारे व माधुरी ठाकरे आणि काँग्रेसचे राजश्री जठाले व धिरज हिवसे विजयी झाले. प्रभाग 6 विलासनगरमध्ये युवा स्वाभिमानचे दीपक साहू, भाजपच्या पूजा अग्रवाल, संजय नरवणे आणि उबाठा गटाच्या रेखा तायवाडे यांनी विजय मिळवला. प्रभाग 7 जवाहर स्टेडियममध्ये सोनाली नाईक, श्रीचंद तेजवानी (भाजप), मनिष बजाज (राष्ट्रवादी) आणि स्नेहा लुल्ला (शिंदे सेना) विजयी झाले. प्रभाग 8 जोग स्टेडियममध्ये काँग्रेसने पूर्ण विजय मिळवत बबलू शेखावत, आसमा खान, अर्चना आत्राम आणि मालती गवई यांना निवडून आणले. प्रभाग 9 वडालीमध्ये विशाल वानखडे (काँग्रेस), पंचफुला चव्हाण (भाजप) आणि ममता आवारे (राष्ट्रवादी) यशस्वी ठरले.
प्रभाग 10 बेनोडा-दस्तुरनगरमध्ये राष्ट्रवादीच्या सुजाता जवंजाल, अर्चना पाटील, मंगेश मनोहरे आणि अविनाश मार्डीकर या पूर्ण चमूने विजय मिळवला. प्रभाग 11 फ्रेंजरपुरा भागात बसपाने आपली ताकद दाखवत विद्या माटे, इस्माईल लालुवाले आणि सचिन वैद्य यांना निवडून आणले, तर भाजपच्या नुतन भुजाडे यांनीही येथे बाजी मारली. प्रभाग 12 बेलपूरामध्ये भाजपच्या राधा कुरिल, स्मिता सूर्यवंशी, प्रदीप हिवसे आणि युवा स्वाभिमानच्या प्रिती रेवने विजयी झाल्या. प्रभाग 13 अंबापेटमध्ये मिलिंद बांबल, लविना हर्षे, स्वाती कुलकर्णी (भाजप) आणि रतन डेंडुले (राष्ट्रवादी) निवडून आले. प्रभाग 14 जवाहरगेटमध्ये विलास इंगोले, सुनीता भेले, ललिता रतावा आणि डॉ. संजय शिरभाते या काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला. प्रभाग 15 गवळीपुरामध्ये काँग्रेस, एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये जागांची विभागणी झाली. प्रभाग 18 राजापेठमध्ये युवा स्वाभिमानचे वर्चस्व राहिले असून नंदा सावदे, प्रशांत वानखडे आणि महेश मुलचंदानी विजयी झाले, तर भाजपच्या पद्मजा कौडण्य यांनी आपली जागा राखली. प्रभाग 19 साईनगरमध्ये भाजपचे चेतन गावंडे व लता देशमुख, शिंदे सेनेच्या मंजुषा जाधव आणि युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे विजयी झाले. प्रभाग 20 सुतगिरणीत संजय गव्हाले (उबाठा), सुमती ढोके (युवा स्वाभिमान), शारदा खोंडे (भाजप) आणि राजेंद्र तायडे (शिंदे सेना) यांनी यश मिळवले. प्रभाग 21 जुनीवस्ती बडनेरामध्ये एमआयएमचे मिरा कांबळे, नुजहत परवीन, नजीब खान आणि युवा स्वाभिमानचे ज्ञानेश्वर आमले विजयी झाले. प्रभाग 22 नवीवस्ती बडनेरामध्ये युवा स्वाभिमानच्या रजनी डोंगरे, अजय जयस्वाल, गौरी मेहवानी आणि किशोर जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला.
अमरावती महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता काबीज करण्यासाठी त्यांना आता युवा स्वाभिमान किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. मतदारांनी दिलेला हा कौल पाहता शहरात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता नाकारता येत नाही. प्रस्थापित दिग्गज नेत्यांना नवख्या उमेदवारांनी धूळ चारल्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. आता महापौर पदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, हे येणार्या काळातील राजकीय समीकरणां वरच अवलंबून असणार आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 25 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, 87 पैकी बहुमतासाठी 45 जागांची गरज असल्याने सत्तास्थापनेसाठी युवा स्वाभिमान (15 जागा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (10 जागा) यांची भूमिका आता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.




