महापौरपदातून भाजपचा ‘डबल चेकमेट’!

राणा दाम्पत्याला थेट संदेश, राष्ट्रवादीला झुकते माप?

अमरावती / 3 जानेवारी : महापालिकेच्या सत्ताकारणात भाजपने अत्यंत चतुर आणि रणनीतीपूर्ण खेळी खेळली आहे. संख्याबळ जुळवताना भाजपने युवा स्वाभिमानला सोबत घेतले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) समावेशाने राणा दाम्पत्याला थेट राजकीय संदेश दिला आहे. निवडणुकीत भाजपसोबत राहूनही विरोधात काम केल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी ’महापौर आपलाच होणार’ असा प्रचार युवा स्वाभिमानकडून केला जात होता, मात्र भाजपने राष्ट्रवादीला जवळ करून त्यांना त्यांच्याच शैलीत रोखले आहे.निवडणुकीत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेणारे आमदार रवी राणा आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात प्रचार करणार्‍या माजी खासदार नवनीत राणा यांना अस्वस्थ करणारी चाल भाजपने महापौरपदाचा उमेदवार ठरवताना खेळली. महापौरपदासाठी जाहीर झालेले श्रीचंद तेजवानी आणि आशिष अतकारे यांच्या विरोधात नवनीत राणा यांनी उघडपणे प्रचार केला होता. युवा स्वाभिमानमुळे भाजपचे डझनभर उमेदवार पराभूत झाल्याने पक्षात मोठा असंतोष होता. या पार्श्वभूमीवर, त्याच उमेदवारांना संधी देऊन भाजपने स्पष्ट केले की पक्षाविरोधी कृती सहन केली जाणार नाही.आमदार रवी राणा आणि संजय खोडके यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. सुरुवातीला खोडकेंनी युतीला नकार दिला होता, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादी महायुतीत सामील झाली. सुलभा खोडके यांनीही फडणवीसांच्या शब्दावर विश्वास व्यक्त केला आहे. महापालिकेत भाजपकडे 25 जागा असून राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांमुळे महायुतीचे संख्याबळ आता 51 वर पोहोचले आहे, जे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 44 पेक्षा जास्त आहे.या रणनीतीतून भाजपने राष्ट्रवादीला झुकते माप देऊन युवा स्वाभिमानची कोंडी केली आहे. उपमहापौरपद आणि स्थायी समितीवर राष्ट्रवादीचे नियंत्रण येण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवून राणा दाम्पत्यावर वचक ठेवण्याचा हा भाजपचा डाव मानला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button