भाजप सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग विस्तारतोय, अमरावतीत सुरुवात!
भाजप आपल्या मुशीत घडवणार मागास जातींचे नेतृत्व

* राज्यसभेसाठी मायाताई इवनाते, रामदास वडकुते आणि महापौरपदी श्रीचंद तेजवानी पक्षाचा चेहरा
* नवनीत राणांना राज्यसभेची संधी नाकारण्यामागे सोशल इंजिनीअरिंगचा अजेंडा
अमरावती /10 मार्च – भाजपने गेल्या आठवड्यात राज्यसभेसाठी आश्चर्यकारकरित्या उमेदवारांची निवड केली. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल अशा शक्यतांचा बाजार गरम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेविका मायाताई इवनाते यांना राज्यसभेत पाठवले. त्यासोबतच अत्यंत सामान्य घरातील रामदास वडकुते यांनाही जेष्ठांच्या सभागृहात सन्मानाने पाठवण्याचा निर्णय झाला. रामदास आठवलेंना पुन्हा संधी देण्यात आली. भाजपच्या एकूण 4 उमेदवारांपैकी 3 उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व एन.टी. प्रवर्गातून अर्थात धनगर समाजातून देण्यात आलेले आहे. विनोद तावडे यांना पक्षासाठी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले असून त्यांच्या रूपाने मराठा कार्यकर्ता राज्यसभेत पोहोचलेला आहे. भाजपने देशभरातील राज्यसभा उमेदवार देताना वरवर आश्चर्यकारक धक्का दिला आहे असे वाटत असले तरी पुढील 25 वर्षांचा विचार करून भाजप आपली वाटचाल करीत आहे. एस.सी., एस.टी., एन.टी. या मागासवर्गीय जातींच्या नेत्यांचा सत्तेतील सहभाग भाजपसाठी मतांची जुळवणूक आहे. हीच बाब शिवसेनेनेही अधोरेखित केली. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिवसेनेतर्फे एकाच उमेदवाराला उमेदवारी द्यायची होती. शिवसेनेचे दिग्गज व वरिष्ठ नेते रांगेत असताना शिंदेंनी ज्योती वाघमारे या आंबेडकरी चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्याला थेट राज्यसभा दिली. भाजप तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी परंपरागत विचारधारेला दूर सारत नव्या मतपेटीवर ताबा मिळवीत आहे. अमरावतीत महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने थेट सिंधी समुदायाचे नगरसेवक श्रीचंद तेजवानी यांना महापौरांचा मुकुट घातला. सिंधी समुदायाने अमरावतीत विविध पक्षांना संधी दिल्यामुळे समुदायाची गठ्ठा मते भविष्यात भाजपलाच मिळावी यासाठी भाजपने सोशल इंजिनीअरिंगची योजना पुन्हा एकदा जागृत केली. अध्यक्ष ते नगरसेवकापर्यंत विविध जाती धर्माच्या लोकांना भाजपने यापूर्वीही संधी दिली आहे. मात्र आता भाजपला पुन्हा एकदा सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग करावा लागत आहे. सत्तेतील जातीपलीकडे इतर कमी लोकसंख्येच्या जातींकडेही भाजप सूक्ष्मपणे बघत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ते मायाताई इवनाते हा अत्यंत नियोजनबद्ध प्रवास भाजपाने केला आहे. आज अमरावतीत पश्चिम विदर्भातील कार्यकर्त्यांसाठी विशेष अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. संयोजक धर्मपाल मेश्राम यांना भाजपने पुढे केले आहे. आजच्या मेळाव्यात त्यांचे भाषण झाले. पक्षाचा मागासवर्गीय चेहरा म्हणून धर्मपाल मेश्राम संबोधन करत होते.
या अभ्यास वर्गासाठी पश्चिम विदर्भातील 10 जिल्ह्यांमधून अध्यक्ष, सरचिटणीस, 130 मंडळ अध्यक्ष, 280 विषय वक्ते तथा प्रदेश पदाधिकारी मिळून एकूण 545 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष रामदासजी तडस, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे पाटील, विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठीकर, महापौर श्रीचंद तेजवानी, महाराष्ट्र प्रदेश प्रशिक्षण सहसंयोजक धम्मपाल मेश्राम, दिनेश सूर्यवंशी आणि अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन धांडे यांच्यासह इतर ज्येष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावे सुरू झालेल्या महाप्रशिक्षण अभियानाचा एक टप्पा आज अमरावतीत पार पडला. 500 कार्यकर्त्यांना पक्षाने सहभागी करून घेतले. समाजातील जाती जातीतील विद्रोह भाजपच्या मतांवर परिणाम करत आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व जातीच्या नेत्यांना भाजप आपल्या शिस्तीत घडवू इच्छितो केवळ जाती जातीचे मेळावे घेऊन भाजपला विकसित होता येणार नाही. जातीचे नेते ज्या पद्धतीने पक्षाशी सौदेबाजी करतात ही गोष्ट लक्षात घेऊन भाजप सोशल इंजिनीअरिंगचा पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे. भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या दिशेने नवीन जोडणी सुरू केली आहे.
संयोजक धम्मपाल मेश्राम यांनी कार्यकर्त्यांना साद घालताना स्पष्ट केले की, कार्यकर्ता कोणत्याही भागातील असो, प्रत्येक अभ्यास वर्गाचे वातावरण हे प्रेरणा देणारेच असायला हवे. शिस्त हा केवळ शब्द नसून ती आपल्या संघटनेची खरी ताकद आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले. विशेषतः कार्यक्रमाच्या ठिकाणची सजावट आणि तिथली सभ्यता यावर त्यांनी भर दिला. भारतमाता आणि महापुरुषांच्या प्रतिमा केवळ औपचारिकता म्हणून लावू नका, तर त्यासाठी एक कायमस्वरूपी सन्मानजनक जागा (स्टँड) तयार करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. महापुरुषांना पुष्पार्पण करण्याची योग्य व्यवस्था असावी, जेणेकरून कार्यक्रमाचे गांभीर्य आणि आदर टिकून राहील.




