भाजप-काँग्रेसचे उमेदवार जाहीर, आज नामांकनाचा शेवटचा दिवस

निवडणूक उमेदवार शक्तीप्रदर्शनात दाखल करणार अर्ज

* शहरांत, ढोल-ताशे आणि प्रचंड उत्साह

अमरावती/16 नोव्हेंबर – जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज नामांकनाचा शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजता मुदत संपणार आहे. त्यामुळे सकाळपासूनच सर्वच शहरांत उमेदवार, समर्थक आणि पक्षकार्यकर्त्यांची प्रचंड धावपळ सुरू आहे. मोटारकाफिले, ढोल-ताशे, घोषणाबाजी आणि निवडणूक कार्यालयांपुढील गर्दीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारी जाहीर करण्यात झालेल्या विलंबामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर भाजप आणि काँग्रेसने आपल्या नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर लढतींना नवे वळण मिळाले आहे. आज दोन्ही पक्षांकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली असून अनेक शहरांत सकाळपासूनच वाहनांची धावपळ वाहतूक सुरू आहे. भाजपने जिल्ह्यातील अकरा नगराध्यक्ष पदांचे उमेदवार जाहीर केले आहेत. या घोषणेनंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली असून अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, रॅली आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. धामणगाव रेल्वे येथे अर्चना रोडे, अंजनगाव सुर्जी येथे अविनाश गायगोले, चिखलदरा येथे राजेंद्र सोमवंशी, अचलपूर येथे रुपाली माथने, चांदूर बाजार येथे कांताबाई अहिर, दर्यापूर येथे नलिनी भारसाकळे, चांदूर रेल्वे येथे स्वाती मेटे, मोर्शी येथे रेशमा उमाळे, धारणी येथे सुनील चौथमल, वरुड येथे ईश्वर सलामे, नांदगाव खंडेश्वर येथे स्वाती पाठक आणि शेंदुर्जना घाट येथे सुवर्णा वरखेडे यांची उमेदवारी ठरवण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने 12 पैकी 10 नगराध्यक्षपदांसाठी उमेदवारांची घोषणा केली असून यादीत महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. धामणगाव रेल्वे येथून वर्षा देशमुख, अंजनगाव सुर्जी येथून आशाबानो खान, चिखलदरा येथून शेख अब्दुल शेख हैदर, अचलपूर येथून नुरूस सहबा एतेशाम नबील, चांदूर बाजार येथून फरहाना तब्बसुम मो. साजिद, दर्यापूर येथून मंदाताई भारसाकळे, चांदूर रेल्वे येथून पूनम सूर्यवंशी, मोर्शी येथून दिपाली भडांगे, धारणी येथून राजकिशोर मालवीय आणि नांदगाव खंडेश्वर येथून विना जाधव यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. वरुड आणि शेंदुर्जना घाट येथील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.त्यासोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानेही मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि अचलपूरसह अनेक ठिकाणी उमेदवारी निश्चित केल्याचे कळते. काही नगरांमध्ये किरकोळ मतभेद झाल्याचे समजते; मात्र अंतिम टप्प्यात सर्व नगरांसाठी उमेदवार ठरवण्यात आले आहेत. अनेक शहरांत बाइक रॅली आणि महिलांच्या मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक कार्यालयांसमोर मोठी गर्दी होणार असल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक प्रश्न, नगरनिहाय राजकीय समीकरणे आणि पक्षांच्या संघटनशक्तीवर या निवडणुकीचा कौल अवलंबून राहणार आहे. शहरांत सुरू असलेल्या डीजे, ढोल-ताशे, मोटारकाफिले आणि सोशल मीडियावरील जल्लोषामुळे आजचा दिवस जिल्ह्याच्या निवडणूक इतिहासातील सर्वाधिक गजबजलेला ठरल्याचे मानले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button