अंजनगाव सुर्जी नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

अग्नितांडवाच्या वेळीच पाठवले नादुरुस्त अग्निशमन यंत्र

अंजनगाव सुर्जी/28 नोव्हेंबर  : सावकार पुरा परिसरात गुरुवार, 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दीपक देवलसी यांच्या घरातील फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन अचानक आग लागली. आग वाढू नये म्हणून नागरिकांनी तातडीने नगर परिषदेचे अग्निशमन वाहन बोलावले. मात्र घटनेच्या तीव्रतेला न जुमानता नगर परिषदेने पाठविलेले अग्निशमन यंत्रच नादुरुस्त अवस्थेत असल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे, तर उर्वरित दोन अग्निशमन यंत्रे देखील निष्क्रिय असल्याचे स्पष्ट झाल्याने नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले.अग्निशमन दलाच्या या भोंगळ व्यवस्थेमुळे परिसरातील नागरिकांना स्वतःहून आग आटोक्यात आणण्यासाठी पुढे यावे लागले. जवळपास तासाभरानंतर अचलपूर येथील अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले, पण तोपर्यंत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आग नियंत्रित केली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित कर्मचार्‍यांनी अग्निशमन विभागाच्या उपकरणांवर योग्य देखरेख न ठेवल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. या निष्क्रियतेबाबत सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांमध्ये जोर धरू लागली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

संबंधित बातम्या

Back to top button