सावधान! बनावट पोलिसांच्या नावाखाली लूटमार

तीन दिवसांत शहर व जिल्ह्यात पाच घटना

-इराणी टोळीवर संशय, गुन्हे शाखेकडून चौकशी
अमरावती / 10 सप्टेंबर : सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठा, रस्ते गर्दीने फुललेले असताना बनावट पोलिसांच्या नावाखाली लुटमारीच्या घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत. अवघ्या तीन दिवसांत अमरावती शहरासह ग्रामीण भागात अशा पाच घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिस प्रशासनाने महिलांसह सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून स्पष्ट केले आहे की खरे पोलिस कधीही रस्त्यावर कोणीही दागिने काढून ठेवावे असे सांगत नाहीत.
शहरात 9 सप्टेंबर रोजी सकाळी वॉकसाठी गेलेल्या महिलेला थांबवून बनावट पोलिसांनी 20 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या हिसकावून घेतल्या. त्याच दिवशी राजापेठ ठाणे हद्दीतील डफळे हॉस्पिटलजवळ 74 वर्षीय वृद्ध महिलेला थांबवून आम्ही पोलिस आहोत असे भासवून तब्बल दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. याच प्रकारे तळेगाव दशासर व वरुड परिसरातही घटना घडल्या.
शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील दोन घटनांमुळे ही कृत्ये इराणी टोळीने केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सर्व घटनांचा धागा एकच असल्याचा अंदाज व्यक्त करत शहर व ग्रामीण गुन्हे शाखा मिळून तपास सुरू आहे. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की बनावट पोलिस दहशत निर्माण करून महिलांना फसवतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
-सतर्कता गरजेची
अशा घटनांना बळी पडण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सकाळी वॉकसाठी, बाजारात किंवा बाहेर पडताना दागिने घालू नयेत. अशा घटना घडल्यास तात्काळ मोठ्याने ओरडावे. पुरुष वर्गाने घरातील महिलांना जागरूक करून या घटनांची माहिती द्यावी, अशी काळजी नागरिकांनी घेतल्यास निश्चित या प्रकारांना थोपविता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जर कोणी स्वतःला पोलिस म्हणून भासवून दागिने काढण्यास भाग पाडत असेल, तर तात्काळ डायल 112 वर कॉल करून पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button