बेस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरवर प्राणघातक हल्ला
डॉ.बोरवार गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू

* चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल
* संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद
अमरावती /28 ऑक्टोबर – गाडगे नगर पोलिस स्टेशन हद्दीतील यास्मिन नगरमध्ये सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास झालेल्या भांडणानंतर एका तरुणाला वलगाव रोडवरील बेस्ट रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णास आणि त्याच्या नातेवाईकांना गोंधळ घालू नये म्हणून समजाविण्यासाठी गेलेल्या डॉक्टरवर त्यांनी प्राणघातक हल्ला केला, त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरला गंभीर दुखापत झाल्याने त्याला बेस्ट रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
जखमी डॉक्टरचे नाव डॉ. ऋषिकेश बोरवार असून, त्यांच्या जबाबावरून पोलिसांनी काझी फयाजुद्दीन उर्फ बाबा काझी एजाजुद्दीन (28) आणि इतर तिघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहराच्या पश्चिम भागातील बेस्ट हॉस्पिटल हे 24 तास सुरू असलेले रुग्णालय असून, येथे आपत्कालीन सेवा दिली जाते. सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास यास्मिन नगरमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत काझी फयाजुद्दीन गंभीर जखमी झाल्याने आठ ते दहा तरुणांनी, चार ते पाच महिलांसह, त्याला बेस्ट रुग्णालयात आणले.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर फयाजुद्दीनसोबत आलेले लोक गोंधळ घालत होते. त्या वेळी डॉ. ऋषिकेश बोरवार दुसऱ्या रुग्णावर उपचार करत होते. गोंधळामुळे इतर रुग्णांना गैरसोय होत असल्याने त्यांनी फयाजुद्दीन व त्याच्या नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, ते सर्व मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी काहीही ऐकले नाही. त्यानंतर त्यांनी डॉ. बोरवार यांच्यावर अचानक हल्ला केला. फयाजुद्दीनने सलाईन स्टँड उचलून डॉक्टरांवर फेकला, तसेच इतर साथीदारांनी त्यांना क्रूरपणे मारहाण केली. या हल्ल्यात डॉ. बोरवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली.
या घटनेमुळे रुग्णालयात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी जखमी रुग्णाला घेऊन पळून गेले होते. पोलिसांनी रुग्णालयाबाहेर कडक सुरक्षा तैनात केली असून, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. त्या आधारे पुढील तपास सुरू आहे.




