सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बेड रिकामे, शस्त्रक्रिया ठप्प
मानधन थकबाकी व वाढीच्या मागणीचा तगादा

-डॉक्टरांचे कामबंद आंदोलन सुरुच, रुग्णांची धावपळ
अमरावती / 15 सप्टेंबर : शहरातील विभागीय संदर्भ सेवा म्हणजेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विशेषज्ञ डॉक्टरांच्या अनिश्चितकालीन कामबंद आंदोलनामुळे आरोग्यसेवा अक्षरश: ठप्प झाली आहे. तब्बल तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने युरोलॉजी, पेडियाट्रीक व प्लास्टिक सर्जरी विभागातील सुमारे 150 बेड रिकामे पडले आहेत. ऑपरेशन थिएटर बंद असल्याने 150 ते 200 शस्त्रक्रिया थांबल्या असून, उपचारासाठी येणारे रुग्णांना तसेच परतावे लागत आहे.
हे आंदोलन 25 ऑगस्टपासून अखंड सुरू आहे. स्वतःचे थकीत मानधन तसेच महागाईनुसार वेतनवाढ यांसह इतर मागण्यांसाठी विशेषज्ञ डॉक्टरांनी काम बंद आंदोलन हाती घेतले आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांचे थकीत मानधन तातडीने देण्यात यावे. गेल्या 17 वर्षांतील महागाईनुसार मानधनात वाढ व्हावी, दरवर्षी किमान 5 टक्के वाढीची हमी द्यावी आणि थकबाकी तीन महिन्यांच्या आत मंजूर करण्यासाठी एसओपी तयार करण्यात यावी. उपचारसेवा सुरू ठेवण्याबाबत ते इच्छुक असले तरी मानधनाशिवाय सेवा देणे आता अशक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात 10 सप्टेंबर रोजी मुंबईत तसेच 11 सप्टेंबर रोजी अकोला येथे झालेल्या बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना सविस्तर माहिती देण्यात आली. मात्र हस्तक्षेप करूनही अद्याप ठोस निर्णय नोंदवण्यात आलेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केले तरीही ठोस तोडगा निघालेला नाही.
त्यामुळे कामबंद आंदोलन सुरुच असून, रुग्णालयातील 150 पेक्षा अधिक बेड रिकामे आहेत. विविध शस्त्रक्रिया थांबल्या आहेत आणि गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी परिस्थिती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष सरकार अखेर या प्रश्नावर कधी आणि कशा प्रकारचा निर्णय घेते याकडे लागले आहे.




