राहत्या घरातून 10.43 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
रामपुरी कॅप्मपध्ये छापा

-गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई
अमरावती / 30 मे: अमरावतीचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशावरुन सध्या शहर पोलिसांनी अवैध व्यवसायांविरुद्ध कंबर कसल्याचे दिसून येत असून छापे व कारवाईचा धडाका सुरु आहे. अशातच आज दुपारी गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने रामपुरी कॅम्प परिसरात एका घरावर छापा मारुन तब्बल 10 लाख 43 हजार 860 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याच्या पुड्यांचा अवैध साठा जप्त केला. आरोपी राजेश भगवानदास केसवाणी याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी असलेल्या राजेश भगवानदास केसवानी याने आपल्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य गुटखा आणि पान मसाल्यांचा मोठ्या प्रमाणात साठ केला असून त्याच्याकडून अवैधरीत्या त्याची विक्री केली जात आहे, अशी माहिती अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 ला प्राप्त झाली होती. त्यावरुन आज दुपारी राजेश केसवानी याच्या निवासस्थानी छापा मारण्यात आला. घराच्या झडतीत तब्बल 10 लक्ष 43 हजार 860 रुपयांचा अवैध गुटख्याचा माल आढळून आला.
त्यामध्ये बाजीराव गोल्ड, पान पराग, पान पराग मसाला, नागपूरी प्रिमीयम, विमल, बाजीराव निळे, पान बहार, 777 पान मसाला, पान रसिया, राजश्री, अन्नी गोल्ड, व्ही-1 तंबाखू, मस्तानी तंबाखू, एच-5 तंबाखू, जोल्ट तंबाखू अशा विविध तंबाखूजन्य पदार्थांच्या हजारो पूड्यांचा समावेश आहे. हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी राजेश केसवानी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.
ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त कल्पना बारवकर, सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अरूण पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक मनिष वाकोडे, योगेश इंगळे, उपनिरिक्षक प्रकाश झोपाटे, कर्मचारी सतिष देशमुख, फिरोज खान, सचिन बहाळे, अलीमउद्दीन खतीब, माधुरी साबळे, नाझिमउद्दीन सैय्यद, विकास गुडढे, सचिन भोयर, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, अशोक खंगार, किशोर खेंगरे, गजानन गोरे यांच्या पथकाने केली.