मोर्शीत भीषण अपघातात बँक अधिकार्‍याचा मृत्यु

आयशर ट्रकची मोटरसायकलला धडक

-निंभी ते शिरखेड मार्गावरील घटना
-मृतक आशिष शेरेकर अमरावतीचे रहिवासी
मोर्शी / 28 ऑगस्ट : तालुक्यातील निंभी ते शिरखेड मार्गावर आज गुरुवारी, 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात घडला. आयशर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत 45 वर्षीय बँक अधिकार्‍याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव आशिष मधुकरराव शेरेकर (रा. अर्जुननगर, अमरावती, वय 45) असे असून, ते अष्टविनायक नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शेरेकर हे गुरुवारी सकाळी आपल्या होंडा यूनिकॉर्न मोटरसायकल (क्र. एमएच 27 एडब्ल्यू 3830) वरून अमरावतीहून बेनोडा शाखेत गेले होते. दिवसभर त्यांनी शाखेतील महत्त्वाचे कामकाज पूर्ण केले. संध्याकाळी परतीच्या प्रवासात शिरखेड फाट्याजवळील चारगड नदी पुलाजवळ मागाहून येणार्‍या आयशर ट्रकने (क्र. एमएच 27 बीएस 3196) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शेरेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची बातमी समजताच आसपासच्या गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही वेळ वाहतूकही खोळंबली होती. नंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या अपघातानंतर ट्रक चालक राजेंद्र जाधव (रा. अमरावती) याला पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शिरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशन धुर्वे, हे.कॉ. विनोद मनोहरे पुढील तपास करीत आहेत.
आशिष शेरेकर हे बँकिंग क्षेत्रातील एक कार्यतत्पर, दूरदृष्टी असलेले अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अष्टविनायक नागरी सहकारी बँकेच्या विविध शाखांमधील कामकाज सक्षम पद्धतीने हाताळले. त्यांच्या मृत्यूने बँकिंग क्षेत्रासह सहकारी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button