तिवसा येथील ऐतिहासिक जंगी किसान शंकरपटात लोकसंस्कृतीचा जागर
शेतकरी परंपरा आणि आत्मसन्मानाला माजी खा.नवनीत राणा यांची मानवंदना

अमरावती / 25 जानेवारी – शेतकरी संस्कृतीचा वारसा, ग्रामीण जीवनातील शौर्याचे दर्शन आणि मातीशी असलेले घट्ट नाते अधोरेखित करणार्या तिवसा येथील ’राष्ट्रीय जंगी किसान शंकरपटा’ने यंदाही यशाचे शिखर गाठले. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ म्हणजे तब्बल चोवीस वर्षांपासून ही धगधगती परंपरा रविराज देशमुख मित्र परिवार आणि हिम्मत फाउंडेशनने जोपासली असून, या सोहळ्याने संपूर्ण विदर्भाचे लक्ष वेधून घेतले आहे. या ऐतिहासिक उत्सवात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी खा. नवनीत रवि राणा यांनी आपली विशेष उपस्थिती नोंदवून बळीराजाच्या या खेळाचा गौरव केला. त्यांच्या उपस्थितीने या स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली असून, देशभरातील नामांकित बैलजोड्यांनी आपल्या चपळाईने आणि ताकदीने मैदान गाजवले. केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर शेतकर्यांच्या असीम कष्टाला आणि स्वाभिमानाला दिलेली ही एक सलामीच ठरली आहे.याप्रसंगी बोलताना नवनीत राणा यांनी शेतकर्याला देशाचा कणा संबोधिले आणि ग्रामीण परंपरा जिवंत ठेवणार्या आयोजकांचे तोंडभरून कौतुक केले. आधुनिक काळातही आपली मूळ संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सोहळ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, मिलिंद देशमुख, सचिन इंगळे, गायत्री देशमुख, अशोकराव देशमुख, लीना मोराधे, गोपाल राठोड, रंगराव लांडे, सरपंच रूपाली राऊत, ललित समदुरकर, धीरज केणे, प्रिया गणोरकर, पवन भोजने, कुणाल कडू, प्रतीक रावेकर, चित्रा घोंगे, शांतनु देशमुख, देवानंद देशमुख, श्याम गवळी, रामकृष्ण गवणार, अमित बांभुळकर, ज्योती यावलकर, प्रदीप अलोने यांच्यासह असंख्य ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्तबद्ध नियोजन आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे हा शंकरपट विदर्भाच्या क्रीडा संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
बळीराजाच्या स्वाभिमानाचा हुंकार
तिवसा येथील हा शंकरपट म्हणजे केवळ बैलांची शर्यत नसून, ती शेतकर्याच्या जिद्दीची आणि कष्टाची गाथा आहे. चोवीस वर्षांपासून सातत्य राखत आयोजकांनी ग्रामीण अस्मिता जपली आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवून शेती संस्कृतीचा डोलारा अधिक मजबूत करणे, हेच या भव्य आयोजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.




