जिल्ह्यात सरासरी 70 टक्क्यांवर मतदान
9 नगरपरिषद व 2 नगरपंचायतींत नागरिकांचा मोठा सहभाग

* काटेकोर सुरक्षा, किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता मतदान सुरळीत
* वरुड : 64.7, अचलपूर : 69.73, मोर्शी : 65.78, शेंदूरजना घाट : 73.5 टक्के मतदान
अमरावती /2 डिसेंबर : जिल्ह्यातील 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीस रविवारी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकशाहीप्रतीची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. सकाळी साडेसातला मतदानाचा प्रारंभ होताच अनेक मतदान केंद्रांवर रांगा दिसू लागल्या. हिवाळ्यातील सकाळीही महिलांचे, तरुणांचे आणि ज्येष्ठांचे मोठ्या संख्येने आगमन पाहायला मिळत होते.
दुपारी साडेतीनपर्यंत 49.80 टक्के मतदान नोंदविण्यात आले होते. संध्याकाळपर्यंत मतदारांची उपस्थिती वाढत गेल्याने सरासरी मतदानाची टक्केवारी सुमारे 70 च्या घरात जाण्याचा अंदाज अधिकार्यांनी व्यक्त केला. अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त होऊ शकली नाही. या निवडणुकीत 11 अध्यक्षपदांसाठी 64 उमेदवार, तर 244 सदस्यपदांसाठी तब्बल 1048 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केल्याने अनेक ठिकाणी बहुकोनी लढती रंगल्या. प्रत्येक नगरपरिषदेत प्रचारकाळात दिसलेली चुरस मतदानाच्या दिवशीही कायम राहिल्याचे चित्र होते. दिवसभर झालेल्या मतदानानंतर सर्व मतदान यंत्रांची कडेकोट बंदोबस्तात स्ट्राँग रूमकडे वाहतूक करण्यात आली. 21 डिसेंबरला होणारी मतमोजणी स्थानिक राजकीय नकाशात बदल घडवू शकते, अशी व्यापक चर्चा मतदारांमध्ये सुरु होती. जिल्हाभरातील 366 मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त फौजफाटा तैनात करून शांततेचे वातावरण राखण्यावर भर देण्यात आला. बहुतेक ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले असले तरी काही केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये किरकोळ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. मोर्शीतील गोपाळराव वानखडे विद्यालय, कसारपुरा आणि शिवाजी कन्या शाळा येथे काही काळ मतदान खंडीत झाले. दर्यापूर व अचलपूरमधील काही केंद्रांवरही तत्सम अडचण निर्माण झाली; मात्र यंत्रे दुरुस्त झाल्यानंतर मतदान सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आले. मतदारांनी संयमाने प्रतिक्षा करत आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये वृद्ध मतदारांसह महिला आणि नवमतदारांमध्ये दिसून आला. तसेच दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अनेकांनी सेल्फी स्पॉटचा आनंद घेत मतदान हक्क बजाविल्याचे दाखवून दिले.
दुपारी साडेतीनपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्हाभर 49.80 टक्के मतदान झाले तर चिखलदरा नगरपरिषद 73.79 टक्के मतदानासह सर्वाधिक टक्केवारी नोंदवणारी ठरली. शेंदूरजनाघाट : 57.76, नांदगाव खंडेश्वर : 55.26 , धामणगाव : 51.59, मोर्शी : 50.30, दर्यापूर : 49.91, वरुड : 48.47, अचलपूर : 48.70, चांदूरबाजार : 45.41, चांदूर रेल्वे : 46.44 आणि धारणी : 46.67 या सर्व नगरपरिषदांमध्ये समाधानकारक मतदान नोंदले गेले. काही ठिकाणी संध्याकाळीही मतदारांची गर्दी कायम असल्याने अंतिम टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
महिला मतदारांचा उत्साह विशेषत्वाने जाणवत होता. अनेक केंद्रांवर महिलांची स्वतंत्र रांग मोठी दिसत होती. नवमतदारांनी कुटुंबीयांसह प्रथमच मतदानाचा अनुभव घेत लोकशाही प्रक्रियेत सहभागाची नवी पायरी गाठली. ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प, पिण्याचे पाणी आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली होती.
दिवसभर शांततेत मतदान पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले असून आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष 21 डिसेंबरच्या मतमोजणीकडे लागले आहे. अनेक नगरपरिषदांमधील चुरशीमुळे निकालाचे समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतदानाचा उत्साह आणि वाढलेली टक्केवारी पाहता यंदाची निवडणूक लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्याचे स्पष्ट झालं आहे.




