मुर्हादेवीत नवरात्रोत्सवाची मंगल सुरुवात

आई जगदंबा नवसाला पावणारी

-भक्तिभाव, श्रद्धा व अध्यात्माचा संगम
-झिंग्राजी महाराज देवस्थानात घटस्थापना
अंजनगावसुर्जी / 21 सप्टेंबर : तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक, मुर्हागाव येथील श्री जगदंबा देवी व झिंग्राजी महाराज संस्थान येथे आज घटस्थापनेनंतर नवरात्रोत्सवाची मंगल सुरुवात झाली असून नऊ दिवस हा संपूर्ण परिसर भक्तिभाव, अध्यात्म व अलौकिकतेच्या दरवळाने भारून जाणार आहे. नवसाला पावणारी आई जगदंबा अशी भाविकांच्या मनामनात दृढ श्रद्धा असून नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीसह राज्यभरातून भाविकांचा महासागर मुर्हागावात जमतो. मंदिर परिसरात आरत्या, भजने, कीर्तने, देवीचे पूजन या सार्‍याने वातावरण दुमदुमून जाते व गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन, विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत व गावकरी भाविकांची सेवा हीच खरी पूजा मानून जय्यत तयारीत व्यस्त झाले आहेत. मंदिराच्या परिसरात दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशस्त पार्किंग, पिण्याचे पाणी, शौचालये, दुकाने लावण्यासाठी जागा यांची तरतूद करण्यात आली असून सर्व परिसर सीसीटीव्ही देखरेखीखाली ठेवला आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिंचोली रहिमापूर पोलिस ठाण्याच्या मार्फत उत्सव काळात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्यात आली आहे.
दरवर्षी नवरात्र काळात आईचे भव्य पूजन, नित्य आरत्या, भजन, कीर्तन, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे मंदिर परिसर भक्तिभावाने उजळतो. नवरात्राच्या नऊ दिवसांत लाखो भाविक देवीला साकडे घालतात, नवस फेडतात व आपल्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी देवीकडे प्रार्थना करतात. या काळात मुर्हागाव हे छोटेसे गाव यात्रास्थळ बनते आणि भाविकांच्या ओसंडून वाहणार्‍या गर्दीने देवस्थानाचा परिसर गजबजून जातो.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने वाहनतळाची कंत्राटी पद्धतीने व्यवस्था केली असून, दर्शन रांगा व्यवस्थित ठेवण्यासाठी कठडे उभारले आहेत. भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. गावातील ग्रामपंचायत, विश्वस्त मंडळ, गावकरी व पोलीस प्रशासन यांच्या सामंजस्याने हा उत्सव शांततेत व भक्तिभावाने पार पडावा यासाठी अपूर्व सहकार्य केले जात आहे.
आई जगदंबा देवी ही भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसाला पावणारी म्हणून ओळखली जाते. अनेक भक्तांनी आपल्या आयुष्यातील संकटातून मुक्त झाल्याची अनुभूती घेतली असून, मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव कथन केला आहे. नवरात्रीच्या पावन काळात देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना अध्यात्मिक ऊर्जेचा व श्रद्धेचा एक आगळावेगळा अनुभव लाभतो. त्यामुळेच मुर्हादेवीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिभाव, श्रद्धा व अध्यात्माचा दीपस्तंभ म्हणून उजळून निघाले आहे.
-वैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक संदर्भ
मुर्हादेवी ही फक्त एक यात्रा नसून अध्यात्मिक श्रद्धेचे अधिष्ठान आहे. या पीठाच्या कार्यपद्धतीत सर्व जातीधर्मांना समान वागणूक दिली जाते. म्हणूनच महात्मा गांधीजींनी या संस्थानच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून पत्राद्वारे गौरविले होते, हा ऐतिहासिक संदर्भ आजही अभिमानास्पद आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून हजारो भक्तांनी मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभवले असून त्यातूनच या शक्तीपीठाविषयी अढळ विश्वास निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button