अतुल पुरी हत्याकांड : 2 लाखांच्या सुपारीवर ‘रक्तरंजित’ कट!
पोलिसांकडून 24 तासांत थरारक उलगडा

-दोघांना अटक, तीन विधी संघर्षित बालके ताब्यात
-गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
अमरावती / 24 ऑगस्ट : बडनेरात महाविद्यालयीन वरिष्ठ लिपिक अतुल ज्ञानदेव पुरी (वय 50) यांची शुक्रवारी हत्या घडवून आणल्याप्रकरणी पोलिसांनी आज, 24 ऑगस्ट रोजी धडक कारवाईत दोन आरोपींना अटक केली आणि तीन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले. साहिल उर्फ गोलू हरी मोहोड (19, रा. आदिवासी कॉलनी, मालटेकडीजवळ, अमरावती) व सक्षम विजय लांडे (19, सावंगा गुरव, नांदगाव खंडेश्वर, अमरावती) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. आरोपींनी कबुली दिली की, ही हत्या दीड ते दोन लाख रुपयांची सुपारी घेऊन केली गेली. सुपारी देणारा मुख्य आरोपी अद्याप पसार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
अतुल पुरी दररोजप्रमाणे नांदुर येथून महाविद्यालयातून रेल्वेने बडनेरा येथे आल्यानंतर आपल्या दुचाकीने अमरावती जून्या बायपासवरील अमर कॉलनीत असलेल्या निवासस्थानी जाण्यासाठी निघाले. स्टेशनपासून काही अंतरावर बडनेरा जुनीवस्तीतील पवारवाडी परिसरात आरोपींनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. चाकूने सपासप दहा-बारा वार करण्यात आले. त्यात अतुल पुरी यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बडनेरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. गुन्हे शाखेनेही तपास सुरु केला होता. याप्रकरणात अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपींचे शोध कार्य हाती घेतले होते. दरम्यान पोलिसांनी गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न केले.
गुन्हे शाखेच्या तपासात आरोपी वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील जंगलात लपलेले आढळले. आरोपी साहील उर्फ गोलू हरी मोहोड आणि सक्षम विजय लांडे यांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यानंतर या रक्तरंजित खेळात तीन विधीसंघर्षित अल्पवयीनांचाही थेट सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. त्यांनाही पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी, तर तिन्ही विधिसंघर्षित बालकांना सुधार गृहात पाठवण्यात आले. साहिल मोहोड आणि सक्षम लांडे या दोन आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी नेउन त्यांच्याकडून अतुल पुरी यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम वदवून घेतला.े
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व श्याम घुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे रमेश धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर टीम व अनेक पोलीस अमंलदारांच्या सहभागाने करण्यात आली. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदिप चव्हाण यांची भूमिका महत्वाची राहीली. कारवाईत सपोनि अमोल कडू, महेश इंगोले आणि अनिकेत कासार, पोलीस अंमलदार-सुनील लासूरकर, दिपक सुंदरकर, गजानन देवळे, फिरोज खान, सतीश देशमुख, आस्तीक देशमुख, मनोज ठोसर, जहीर शेख, सचीन बहाळे, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, अतुल संभे, नईम बेग, विकास गुडधे, नाझीमोददीन, विशाल वाकपांजर, राहुल देंगेकर, राजीक रायलीवाले, रंजीत गावंडे, सुरज चव्हाण, निलेश वंजारी, संदीप खंडारे, राहुल दुधे, चेतन शर्मा, अलीमोददीन खतीब, निखील माहूरे यांचा सहभाग होता.
-मास्टरमाइंडचा शोध सुरु
गुन्हे शाखेच्या तपासात आता सर्वाधिक चर्चेत आहे तो सुपारीचा आदेश देणारा अज्ञात मास्टरमाइंड. हत्येची योजना पैशांच्या व्यवहारातून राबविण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुन्हे शाखा पोलिस सुपारी देणार्या मास्टर माइंडचा शोध घेत आहे. त्याला अटक झाल्यानंतरच अतुल पुरी यांच्या हत्येची सुपारी देण्यामागचे कारण स्पष्ट होणार आहे.




