परतवाड्याच्या अल्पवयीन मुलीवर अकोल्यात बळजबरीचा प्रयत्न
धावत्या ऑटोत चालकाकडून संतापजनक कृत्य

-युवतीने दाखविले साहस, आरोपी गजाआड
अमरावती / 5 जुलै: अकोला शहरातील एका धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अकोला शहरात शिक्षणासाठी राहणार्या परतवाडा येथील एका अल्पवयीन मुलीचा चालकाने धावत्या ऑटोमध्ये विनयभंग केला. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न देखील ऑटो चालकाने केला. मात्र, मोठ्या हिंमतीने मुलीने स्वत:ची सुटका करून घेत थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ ऑटो चालकाला गजाआड केले. जाफर खान सुभेदार खान (रा.नवेगाव, अकोला.) असे नराधम आरोपीचे नाव आहे.
अकोला शहरात बाहेर गावावरून विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येतात. परतवाडा येथील एक 16 वर्षीय विद्यार्थिनी नीटच्या शिकवणी वर्गासाठी शहरात भाड्याच्या खोलीत राहते. ती आजारी असल्याने परतवाडा येथे गेली होती. शुक्रवारी सायंकाळी बसने ती अकोल्यात परतली. बसस्थानकावरून आपल्या खोलीवर जाण्यासाठी ती एका ऑटोरिक्षामध्ये बसली. ऑटो बसस्थानकावरून निघाला. चालकाने ऑटो वेगळ्याच मार्गाने नेण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीला संशय आला. मुलीने प्रसंगावधान राखत आपल्या मित्राशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मुलगी हा प्रकार सांगत असतांनाच ऑटो चालकाने मुलीचा हात पकडून स्वतःजवळ ओढले. मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलीने प्रतिकार केला असता त्याने मुलीच्या डाव्या हातावर आणि हाताच्या दंडाला चावा घेतला. झटपट करून अल्पवयीन मुलीने स्वत:ची सुटका करून घेतली.
पीडित मुलीने थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. घडलेली माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता तातडीने ऑटो रिक्षा चालकाचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. मुलीने ऑटोचा क्रमांक देखील दिला. त्यामुळे पोलिसांना ऑटो चालकाचा शोध घेण्यास मोठी मदत मिळाली. एमएच 30 ई 9497 या क्रमांकाचा ऑटो देखील पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी कलम 74, 118 (1), 137 (2) बीएन सहकलम 8 पोक्सोनुसार जाफर खान सुभेदार खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रहार आणि बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी पोलीस ठाणे गाठून विनयभंग करणार्या रिक्षा चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.




