मंडळ अधिकारी व तहसीलदारांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

रेती माफियांकडून जीवघेणा हल्ला

-ट्रक चालकाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
-बडनेरा हद्दीत हातुर्णा गावाजवळची घटना
अमरावती / 1 ऑगस्ट : राज्यात अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी शासन यंत्रणा सक्रीय झाली असतानाच रेत माफियांकडून थेट शासकीय अधिकार्‍यांच्या जीवावर उठण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकारात निंभा मंडळाचे मंडळ अधिकारी राजेश गोपालराव धवणे (53) आणि भातकुलीचे तहसीलदार यांच्यावर ट्रक घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही थरकाप उडवणारी घटना 30 जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजा हातुर्णा येथे घडली.
सध्या जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांनी रेती तस्करांविरोधात संयुक्त मोहीम उघडली आहे. अवैध उत्खनन, साठा व वाहतूक करणार्‍या ट्रकवर कारवाई सुरु आहे. 30 जुलै रोजी निंभा मंडळ अधिकारी राजेश धवणे व भातकुली तहसीलदार यांचे पथक हातुर्णा येथील पेढी नदी परिसरात गस्त घालण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना एक बिना नंबरचा टाटा मिनी ट्रक अवैधरित्या रेती वाहून नेत असल्याचे दिसले. संबंधित ट्रक थांबवून तपासणी करण्याचा अधिकारी वर्गाने प्रयत्न केला असता, साहेब खान मिया खान पठान (45, रा. लालखडी, अमरावती) या मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून ट्रक चालकाने ट्रक थेट अधिकार्‍यांच्या दिशेने धाववत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत मंडळ अधिकारी आणि तहसीलदार वाचले, मात्र त्यांचा जीव धोक्यात आल्याची स्पष्ट बाब आहे.
या संपूर्ण प्रकाराची तक्रार मंडळ अधिकारी राजेश धवणे यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी साहेब खान पठान याच्याविरुद्ध भारतीय न्याया संहितेच्या कलम 303(2), 132, 3(5) अन्वये तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 9 व 15 आणि खनिज विकास व नियमन अधिनियम 1957 चे कलम 3, 4, 21 नुसार गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीच्या मागावर असून, लवकरच अटकेसाठी विशेष पथक नेमले जाण्याची शक्यता आहे.
या प्रकारामुळे शासकीय अधिकारी कार्यरत असताना असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात रेती तस्करी मागील काळात अनेकदा चर्चेचा विषय ठरली असली, तरी आता ती थेट शासकीय यंत्रणांवर हल्ला करण्याइतपत बिनधास्त झाली आहे, हे लक्षात घेता, यावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने अधिक आक्रमक पावले उचलावी लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
-प्रशासकीय यंत्रणांमध्ये खळबळ
या घटनेनंतर संपूर्ण महसूल व पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. शासकीय अधिकार्‍यांच्या जीवाला धोका पोहचवणार्‍या अशा गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुळावर प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. सद्या आरोपी फरार असून त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अधिकार्‍यांच्या वर्तुळातून जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button