पोलीस अधीक्षक कार्यालयात होतो, मराठीचा दररोज खून!
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात पोलीस खात्याकडून मराठीचे धिंडवडे

अमरावती/27 जानेवारी – महाराष्ट्र शासनाची अधिकृत पत्रव्यवहाराची भाषा प्रमाण मराठी असताना, पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसारमाध्यमांना दिल्या जाणार्या प्रेसनोट्समधील भाषा अत्यंत अशुद्ध, अप्रमाणित व गचाळ असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. या कार्यालयात जणू दररोज मराठी भाषेचा खून होत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयाकडून दररोज प्रसारमाध्यमांना प्रेसनोट देण्याची परंपरा आहे. या प्रेसनोटमध्ये एकूण दहा स्तंभ असतात. त्यामध्ये पोलीस स्टेशन, गुन्हा क्रमांक, गुन्ह्याचा प्रकार, घटनास्थळ, घटनेची वेळ, गुन्हा दाखल तारीख, फिर्यादीचे नाव, आरोपीचे नाव आणि संक्षिप्त हकीकत यांचा समावेश असतो.
द. 27 जानेवारी रोजी जिल्ह्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली होती. त्यामध्ये ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्याचे विवरण नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आरोपीचे नाव नितेष सुरेष बारस्कर, वय 22 वर्ष, व्यवसाय – मंजुरी, रा. षिरजगाव कसबा ता. चांदुरबाजार असे नमूद करताना मराठी वर्णमालेचा अत्यंत चुकीचा वापर करण्यात आला आहे. या प्रेसनोटमधील ‘संक्षिप्त हकीकत’ हा भाग तर अक्षरशः वाचण्याजोगा नाही. हकीकत पुढीलप्रमाणे दिली आहे-थोडक्यात हकिकत अषा प्रकारे आहे की यात नमूद घ ता वेळी व ठिकाणी यातील नमुद आरोपी याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय 17 वर्षे, रा. विश्रोळी हीला घरी कोनालाही न विचारता फूस लावून पळवून नेले. यावरून फि च्या जबानी तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद. अशा प्रकारची भाषा पाहता ही प्रेसनोट कोणत्या भाषेत आहे, असा प्रश्नच उपस्थित होतो. सध्या महाराष्ट्र शासनातर्फे 14 ते 28 जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जात आहे. अमरावती येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर देशभरात मराठीचा गौरव होत आहे. महाराष्ट्रातील पहिले मराठी विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे आहे. महानुभाव पंथाच्या ग्रंथांमधून मराठी वाङ्मय विकसित झाले असून, अमरावती जिल्ह्यात रिध्दपूर येथे महानुभाव पंथीयांची काशी असुन मराठीतील वाड्ःमय महानुभाव पंथीयांचे आहे. जिल्ह्याला मराठी भाषेचा समृध्द वारसा आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकार्यांपैकी किती अधिकारी मराठी भाषेचे जाणकार आहेत, हा प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांच्या दप्तरी भाषेला काहीच महत्त्व नाही, असाच अर्थ या प्रकारातून निघतो. मराठी भाषा व मराठी माणूस यावर महाराष्ट्राचे राजकारण होत असताना, शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडून मराठीची अशी हेळसांड होणे गंभीर बाब आहे. या प्रकरणाची संबंधित कार्यालयाने दखल घेऊन मराठीचा दररोज खून करणार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून दिली जाणारी प्रत्येक प्रेसनोट शुद्ध मराठीत असावी, हा मराठीजनांचा रास्त आग्रह आहे. ‘मराठी भाषेचे खरे मारेकरी कोण?’ असा प्रश्न कोणी विचारला, तर पोलीस कोणाला पकडणार? असा उपरोधिक सवाल उपस्थित होतो. पोलीस अधीक्षक कधीतरी या प्रेसनोट्स पाहत असतील, कदाचित वाचतही असतील. आयपीएस दर्जाचे अधिकारी मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञानही ठेवत नसतील, तर त्यापेक्षा मराठीचे मोठे दुर्दैव कोणते? अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे दिला जाणारा दैनिक गुन्हे अहवाल इतक्या सूक्ष्म अक्षरांत दिला जातो की, भिंग लावून पाहिले तरी तो नीट वाचता येत नाही. दैनिक गुन्हे अहवाल ही केवळ प्रसारमाध्यमांची गरज नाही, तर त्यातून शहर व जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातील गुन्ह्यांची माहिती मिळते. समाजातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे आणि गुन्हेगारांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हेगारांना समाजात मोकाट फिरणे शक्य होत नाही. पोलीस प्रेसनोट किंवा दैनिक गुन्हे अहवाल हे केवळ माध्यमांसाठी नसून, त्यातून जनता जागृत होते. या अहवालांचे अनन्यसाधारण महत्त्व असताना पोलीस प्रशासनाकडून या बाबीकडे होत असलेले दुर्लक्ष अक्षम्य आहे.
अमरावतीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि शहर पोलीस आयुक्त राकेश ओला हे मराठी भाषिक नसल्याने कदाचित त्यांच्या कार्यालयातून दिल्या जाणार्या प्रेसनोट्स अत्यंत गचाळ, अशुद्ध व अप्रमाण मराठीत दिल्या जात आहेत, याची त्यांना जाणीव नसावी. मात्र हा प्रकार मराठी भाषेचा उघड अपमान करणारा आहे. या प्रकरणाची वरिष्ठांनी तातडीने दखल घेऊन संबंधितांवर ‘मराठीचे मारेकरी’ म्हणून गुन्हे दाखल होतील का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.




