आशिया खंडातील सर्वात उत्तुंग गगनभरारी स्कायवॉक पूर्ण
विदर्भाच्या नंदनवनात पर्यटनाचा नवा अध्याय

* पर्यटक वाढल्याने स्थानिकांना मिळणार रोजगाराची संधी
चिखलदरा / 25 जानेवारी -विदर्भाचे नंदनवन आणि थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या चिखलदर्यात पर्यटकांच्या स्वागतासाठी आशिया खंडातील सर्वात मोठा स्कायवॉक सज्ज होत आहे.
चिखलदरा तालुका प्रतिनिधी अबोदनगो एस. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिकेन पॉईंट ते गोराघाट पॉईंट या दोन टोकांना जोडणारा 407 मीटर लांबीचा हा अजस्त्र लोखंडी सांगाडा आता पूर्णपणे उभा राहिला आहे. साधारण 40 कोटी 26 लाख रुपये खर्चून उभारल्या जाणार्या या प्रकल्पाने आता अंतिम टप्पा गाठला असून मार्च 2026 पर्यंत तो पूर्ण करण्याचे शासनाचे कडक निर्देश आहेत.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे केवळ चिखलदर्याच्या सौंदर्यात भर पडणार नाही, तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि निसर्ग पर्यटनासाठी येणार्या जगभरातील पर्यटकांची पहिली पसंती या ठिकाणाला मिळेल.
सध्या पुलाच्या मुख्य भागाचे काम पूर्ण झाले असून, केवळ काचा बसवणे आणि इतर किरकोळ तांत्रिक कामे शिल्लक आहेत. पुढील चार ते पाच महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून, यामुळे स्थानिक नागरिकांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर काम मिळणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक बाजारपेठेत आर्थिक सुबत्ता येईल आणि चिखलदरा हे जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पर्यटनाचा नवा मानदंड
चिखल दर्यातील हा स्कायवॉक दोन खोल दर्यांच्या मध्ये बांधलेला अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. हरिकेन आणि गोराघाट या दोन टोकांना जोडणार्या या पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले आहे. मार्च 2026 पूर्वी हा प्रकल्प पूर्ण करून तो पर्यटकांच्या सेवेत रुजू करण्यासाठी कंत्राटदार आणि प्रशासन पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहेत.




