प्रॉपर्टीच्या विवादातून दोन गटात सशस्त्र संघर्ष

बडनेरा जुनीवस्तीतील घटना

-रॉड, तलवारी चालल्या, रिवॉल्वरही निघाली
-5 जण जखमी, 13 जणांवर गुन्हा
-दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी
अमरावती/ 15 जुलै: मालमत्तेच्या विवादातून दोन मित्रांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर दोन गट आमनेसामने येउन सशस्त्र संघर्ष उफाळल्याची घटना बडनेरा जुनीवस्तीमधील इस्लाम चौक परिसरात घडली. दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकांवर लोखंडी रॉड, तलवारी आणि अन्य तिक्ष्ण शस्त्रांनी हल्ला केला. यावेळी रिवॉल्वरही ताणण्यात आली. या घटनेत दोन्ही गटातील 5 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रारीवरुन बडनेरा पोलिसांनी दोन्ही गटातील एकुण 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी, 14 जुलैच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडून तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
प्राप्त माहितीनुसार बडनेरा नूर नगर येथे राहणारा शेख मोहम्मद इमरान अब्दुल सईद (45) आणि अब्दुल मोबीन अब्दुल रशीद (41) हे दोघे मित्र आहेत. त्यांनी आणखी एका मित्रासोबत भागीदारीत यवतमाळ जिल्ह्यात 23 एकर जमीन खरेदी केली होती. शेख मो. इमरान याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याला जमीनीतील आपल्या वाट्याची अर्धी जमीन विकायची होती. मात्र त्यासाठी अब्दुल मोबीन तयार नव्हता. पैशाची निकड असल्याने इमरानला आपला हिस्सा विकणे आवश्यक असल्याने सोमवारी रात्री मोबीनला समजाविण्यासाठी तो आपल्या भावासह त्याच्या घरी गेला.
तेव्हा अब्दुल मोबीन आणि त्याचे भाउ अब्दुल नईम, अब्दुल नदीम, अब्दुल मुकिम, अब्दुल फारुख, अब्दुल माफिया, आणि स्वत: अब्दुल मोबीन व अन्य दोघांनी इमरानला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर रिवॉल्वर ताणून जिवे मारण्याची धमकी दिली. याचवेळी इमरानच्या भावाच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आला, त्यात तो जखमी झाला.
दुसरीकडे अब्दुल मोबीन अब्दुल रशीदने इमरानने दिलेल्या तक्रारीच्या विपरित माहिती देत दुसरी तक्रार दाखल केली. इमरानला जमीनीतील त्याचा हिस्सा विकायचा होता, मात्र आपण त्यासाठी त्याला नकार दिला. इमरानने जमीन विकण्यासाठी आपल्याकडे तगादा लावला होता. तो सतत फोन करत होता. अशातच सोमवारी रात्री इमरानने आपल्याला फोन केला आणि आपल्या भाचाच्या हाताने जिवे मारण्याची धमकी दिली. असे मोबीनने तक्रारीत म्हटले आहे.
त्याने काही वेळाने पून्हा फोन केला मात्र आपण तो उचलला नाही. त्यानंतर दहा मिनिटांनी इमरान आपले साथीदार मो. साजीद (45), मो. उमीर (25), मो. फैजान अब्दुल सत्तार (28), मो. नदीम (35) आणि अब्दुल वसीम अब्दुल खालीक (44) यांना घेउन हातात तलवार, लोखंडी रॉड घेउन आपल्या घरी पोहोचला. त्याने आपल्याला जबरदस्तीने बाहेर येण्यास सांगून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आपला लहान भाउ मुकिम, चुलत भाउ अब्दुल, आई महमूनबी आणि आपल्यावर तलवार, लोखंडी रॉडने हल्ला करुन गंभीररीत्या जखमी करण्यात आल्याचे मोबीनने तक्रारीत म्हटले आहे. यावेळी परिसरातील लोक तेथे गोळा झाले. तेव्हा मो. उमेर आणि मो. फैजान यांनी रिवॉल्वर ताणून सर्वांना तेथून हाकलून दिले, असेही अब्दुल मोबीनने नमूद केले आहे.
या घटनेमुळे इस्लाम चौक परिसरात सोमवारी रात्री चांगलीच तणावाची स्थिती निर्माण होउन खळबळ उडाली होती. या घटनेत जखमी पाच जणांवर उपचार करण्यात आले. दोन्ही गट बडनेरा पोलिस ठाण्यात पाहोचले तेव्हा तेथेही मोठी गर्दी झाली होती. परस्परविरोधी तक्रारीवरुन बडनेरा पोलिसांनी दोन्ही गटाच्या 13 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करित आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button