उमेदवारांची घोषणा न झाल्यामुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंद
दोन दिवसांपासुन केवळ एक अर्ज दाखल : शेवटच्या दिवसांमध्ये प्रचंड गर्दी होणार

वरुड । 11 नोव्हेंबर – वरुड नगरपरिषदेच्या 26 आणि शेंदुरजनाघाट नगरपरिषदेच्या 20 नगरसेवक निवडीसाठी निवडणुक प्रक्रिया सुरु असून गेल्या दोन दिवसांपासुन उमेदवारी अर्ज ऑनलाईन दाखल करणे सुरु असतांना वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे अद्याप वरुड नगरपरिषदेंमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही तर शेंदुरजनाघाटमध्ये केवळ एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज थेटपणे ऑनलाईन दाखल होत नसल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पुर्णत: ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केल्या जात आहे. विशेष म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीकडून अद्यापही नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाच्या उमेदवारांची घोषणा झाली नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सद्य: मंद गतीने सुरु आहे.
वरुड आणि शेंदुरजनाघाट नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असल्यामुळे आधीच राजकीय क्षेत्रात अत्यंत संवेदनशिल समजल्या जाणार्या या दोन्ही नगरपरिषदांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात उत्साह दिसून येत नाही, गेल्या अनेक वर्षांपासुन नगराध्यक्षपदाची निवडणुक लढण्याचे डोहाळे लागलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. दोन्ही नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असतांना सुध्दा आपल्यालाच उमेदवारी मिळावी? याकरीता प्रत्येक जण प्रयत्नरत असून कुणी आमदार उमेश उर्फ चंदु यावलकर, कुणी राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, कुणी भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख तर कुणीही पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचेकडून आपल्याच उमेदवारी मिळावी? याकरीता प्रयत्नरत असल्याचे दिसुन येत आहे. वरुड आणि शेंदुरजनाघाट येथील नगराध्यक्षपदाकरीता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार राहणार, हे सुर्यप्रकाशा एवढे खरे असले तरी विरोधी गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार देणार की राष्ट्रीय काँग्रेसचा की शिवसेनेचा याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे भाजपामध्ये उमेदवारी मागणार्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे भाजपाचा पोळा फुटण्याची आम्ही वाट बघत आहोत, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या एका नेत्याने व्यक्त केली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशांना हाताशी घेवुन आपल्या पक्षाशी उमेदवारी देवुन भाजपाच्या उमेदवाराला शह देण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे कोणत्याही राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार घोषित न केल्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा बी प्लॅन तयार असून जर उमेदवारी मिळाली नाही तर पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकच जण शोधताना दिसत आहे. सर्वाधिक उमेदवारांची भाऊ गर्दी ही भारतीय जनता पार्टीमध्ये दिसत असली तरी जर भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली नाही तर इतर कोणाकडे उमेदवारी मागायची? याबाबत अनेकांनी दुसर्या पक्षाशी सुद्धा बोलणे सुरू केले असून महायुती किंवा महाविकास आघाडी शिवाय अपक्ष उमेदवारांचे पॅनल सुद्धा या निवडणुकीत दिसून आले तर नवल वाटायला नको, त्यामुळे सत्तारूढ भारतीय जनता पार्टीला ही निवडणुक सोपी वाटत असली तरी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पक्षाचे उमेदवार घोषित केल्यानंतर काय होणार? याबाबत वेळ सांगणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोणाचा पराभव होणार? कोणता पक्ष नंबर एक वर राहणार? आणि कोणता पक्षाचा नगराध्यक्ष बनणार? याबाबत कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही, अशा स्थितीत विद्यमान आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांचेसह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वरुड नगरपरिषदेच्या 26 आणि शेंदुरजनाघाट नगरपरिषदेच्या 20 नगरसेवक निवडीसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून वरुड नगरपरिषदेमध्ये एकूण 40 हजार 890 मतदार असून त्यापैकी 20 हजार 481 पुरुष तर 20 हजार 409 महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असतांना सुध्दा वरुड नगरपरिषदोंमध्ये अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही तर शेंदुरजनाघाटमध्ये केवळ एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.




