चांदूरबाजारच्या अनुज चौधरीची भारतीय कबड्डी संघात निवड
आशियाई युवा स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणार

-फिजिकल अकॅडमी व हव्याप्र मंडळाचा खेळाडू
चांदुर बाजार / 10 जुलै: चांदूरबाजारच्या फिजिकल अकॅडमी व अमरावती येथील श्री हनुमान क्रीडा प्रसारक मंडळातील जिद्दी व परिश्रमाने शिखर गाठणारा जिगरबाज कबड्डीपटू अनुज चौधरी याची भारतीय राष्ट्रीय युवा कबड्डी संघात निवड झाली आहे. अनुज चौधरी हा आशियाई युवा कबड्डी स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. अजुनचे हे यश चांदुर बाजार शहरासाठी अभिमानाचा विषय ठरले असून त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
दिवस-रात्र मेहनत करून अनुज चौधरीने हे यश संपादन केले आहे. सुरुवातीला तो गोसी टोम्पे महाविद्यालयाच्या प्रांगणात कबड्डीचा सराव करत होता. अनेक स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करित त्याने विदर्भ कबड्डी संघाच्या निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले. त्याच्या कामगिरीची दखल घेउन त्याची उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल कबड्डी स्पर्धेकरिता विदर्भ कबड्डी संघात झाली होती. अनुजने दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेसह खेलो इंडिया या नामांकित स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात अनूजचा महत्वाचा वाटा होता. सध्या तो विदर्भातील एक अग्रगण्य कबड्डीपटू समजला जातो. अखिल भारतीय कबड्डी संघटनेचे सचिव आणि विदर्भ अॅम्युचर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रसिंह ठाकुर, सचिव अशोक देशमुख, सहसचिव सतीश डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुजची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. तो स्पर्धेपूर्वी प्रो कबड्डीतील पटना पायलट या संघाच्या शिबीरात प्रशिक्षण घेणार आहे. त्यासाठी आजच तो पुणे येथे रवाना झाला. यानंतर तो भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरातही सहभागी होणार आहे.
आशियायी स्पर्धेकरिता राष्ट्रीय संघात निवड झाल्याबद्दल गोसी टोम्पे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्कर टोम्पे, सचिव विजय टोम्पे, आनंद अहिर, जेष्ठ पत्रकार सुरेश सवळे, पत्रकार सागर सवळे, सुयोग गोरले, मनोज कटारिया, विनोद कोरडे, जीवन जवंजाळ, अतुल रघुवंशी, लखन चौधरी, भूषण अहिर, अक्षय श्रीराव, सुमित घोम, सनी चिखले, आदित्य वानखडे, ऋषिकेश पोहकार, सुजल अहिर, प्रणव ठाकरे, ऋषीकेश तिवाडे, ओम नाकाडे, भूषण राऊत, अभि पवार, साहिल भगत, यश धोमणे, संजोग लांडे, उमेश बसिने, अंकित जुनघरे आदींनी अनुज चौधरीचे अभिनंदन केले आहे.




