जिल्हा बँक प्रकरणात बच्चू कडूंना आणखी एक नोटिस

वैधतेवर आक्षेप, हायकोर्टात आव्हान

अमरावती / 16 जुलै : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासमोरील अडचणी संपायला तयार नाही. आता विभागीय सहनिबंधकांनी सहकार अधिनियमाच्या नियम 79 अंतर्गत बच्चू कडू यांच्या नावे आणखी एक नोटिस जारी केली आहे. मात्र या नोटिसीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात आव्हान देत या कार्यवाहीविरोधात याचिका दाखल केली आहे.
उल्लेखनीय आहे की, गत महिन्यात विभागीय सहनिबंधकांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नियमबाह्य ठरवून बच्चू कडू यांना संचालक पदासाठी अपात्र घोषित केले होते. या आदेशाला बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. तेव्हा न्यायालयानेही सहनिबंधकांच्या आदेशाला स्थगिती देत बच्चू कडू यांना दिलासा दिला होता. परंतू आता विभागीय सहनिबंधकांनी बच्चू कडू यांच्या नावे आणखी एक नोटिस जारी केली आहे. त्याला बच्चू कडू यांनी आपले वकिल अ‍ॅड. आर. एल. खापरे आणि अ‍ॅड. प्रविण कडू यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
काही दस्तावेज सादर करण्यात आल्याची आपत्ती नोंदवून सहनिबंधकांनी आपल्याला नोटिस पाठविली आहे. मात्र त्यांना सहनिबंधकांना नेमके कोणते दस्तावज अपेक्षित आहेत, याची पूर्वसूचना न देताच ही कार्यवाही करण्यात आली आहे. असे नमूद करुन त्याविरोधात बच्चू कडू यांनी ही याचिका दाखल केली. हे दस्तावेज बँकेच्या अध्यक्षाकडे नसतात. ते सीईओंच्या अखत्यारित आहेत, त्यामुळे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांना अशी नोटिस जारी करण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.
याप्रकरणात उच्च न्यायालयाने सहाकार व पणन विभागाचे सचिव, विभागाय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेच अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाच्या नावाने नोटिस जारी करुन सर्वांना आपापले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. याप्रकरणात नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या न्यायपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. राज्य सरकारकडून आपला पक्ष मांडण्यासाठी मुदत मागण्यात आल्याने न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यानंतर निश्चित केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button