तिवसा तालुक्यातील धामंत्रीचे प्राचीन नागेश्वर महादेव मंदिर

श्रावण सोमवार विशेष

-410 किलोची घंटा आणि सहा किलोमीटरपर्यंत घुमणारा नाद
अमरावती / 17 ऑगस्ट : श्रावण सोमवार… शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस. महाराष्ट्रातील मंदिरांत या दिवशी विशेष उत्साह पाहायला मिळतो. अशाच ठिकाणांपैकी एक आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र धामंत्रीचे नागेश्वर महादेव मंदिर. या मंदिराची वैशिष्ट्ये इतकी अद्भुत आहेत की एकदा येथे आलेला भाविक परत परत इथे येत राहतो. या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 410 किलोची महाकाय घंटा. मंदिरात नव्हे तर समोर उभारलेल्या स्वतंत्र देवालयात ही घंटा टांगण्यात आली आहे. आजही भाविक जेव्हा ती वाजवतात तेव्हा तिचा गगनभेदी नाद सहा किलोमीटरच्या परिघात ऐकू येतो. श्रद्धाळूंच्या मते या घंटेचा नाद भक्ती, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार करतो.
धामंत्रीचे हे मंदिर स्वयंभू शिवलिंग असल्याने त्याचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढले आहे. या शिवलिंगावर 94 किलो वजनाची अष्टधातूची पिंड बसवण्यात आली आहे. या दुर्मिळ व संरक्षित पिंडीमुळे मंदिराला अनन्यसाधारण ओळख प्राप्त झाली आहे. एका अखंड दगडात कोरलेले हे मंदिर सुमारे 5000 वर्षांपूर्वी बांधले गेले, अशी मान्यता आहे. हेमाडपंथी शैलीतील ही वास्तू आपल्या प्राचीन वैभवाची ग्वाही देते. 1607 मध्ये पेशव्यांच्या काळात याचा जिर्णोद्धार झाल्याचे ऐतिहासिक नोंदी सांगतात. वर्धा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर निसर्गरम्य सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. हिरवाईने नटलेला परिसर, नदीचा किनारा आणि घंटानादाने गूंजणारे वातावरण भाविकांना अध्यात्मिक अनुभव देऊन जाते.
धामंत्रीच्या नागेश्वर महादेव मंदिरात कालसर्पदोष निवारणासाठी विशेष पूजा केली जाते. त्यामुळे दूरदूरवरून भाविक या ठिकाणी येतात. महाशिवरात्री व श्रावण सोमवारच्या दिवशी मंदिरात प्रचंड गर्दी उसळते. श्रावण सोमवारच्या निमित्ताने नागेश्वर महादेव मंदिराला भेट देणे ही एक अविस्मरणीय अनुभूती आहे. येथे येऊन गगनभेदी घंटेचा नाद ऐकणे, स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेणे आणि शांत निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण व्यतीत करणे – हे प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातील आध्यात्मिक ठेवा ठरते. धामंत्रीचे हे मंदिर केवळ अमरावती जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे एक अनमोल आध्यात्मिक रत्न आहे. श्रावण सोमवारच्या या पवित्र दिवशी महादेवाला साकडं घालून जीवनात शांती, समाधान आणि समृद्धीची प्रार्थना करू या.

संबंधित बातम्या

Back to top button