अमरावतीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

मुंबई/10 मार्च राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंगळवारी (ता. 10 मार्च) विधानसभेत राज्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व नागपूर याठिकाणी प्रस्तावित करण्यात आली आहेत. याला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचाही राज्यातील हजारो शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यांची लोकसंख्या, जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र, जिल्ह्याचे दुर्गम क्षेत्र, तालुक्यांची संख्या, प्रशासकीय सोय, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन महसूल विभागाने 11 नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये निर्मिती प्रस्तावित केली होती, अशी माहिती सुद्धा मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात दिली. त्यामुळे आता शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा वाढता व्याप आणि नागरी क्षेत्रातील वाढलेली लोकसंख्या याकरिता हे नवे 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेत नव्या 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निर्मितीचे निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले. यावेळी ते याबाबतची सविस्तर माहिती देताना म्हणाले की, राज्यातील लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदने, शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा वाढता व्याप आणि नागरी क्षेत्रातील वाढलेली लोकसंख्या, जिल्ह्यातील दूरच्या भागातील जनतेस तातडीने व नजीकच्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत जिल्हा कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप व या सर्व बाबींचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार राज्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यास्तव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button