फोरव्हीलरमधील गाडीच्या डिक्कीमधून पैसे लंपास करणारी परराज्यीय टोळी जेरबंद
*परतवाडा पोलिसांची कारवाई

* 91 हजाराचा ऐवज जप्त
परतवाडा /12 ऑक्टोबर : दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी फिर्यादी काशीनाथ विनायक चर्हाटे (वय 56, व्यवसाय – प्राध्यापक, श्री. छगनलाल मुलजीभाई कढी महाविद्यालय, परतवाडा) यांनी पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला की, त्यांनी महाराष्ट्र बँकेतून पैसे काढले आणि ते त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीत समोरील ड्रॉवरमध्ये ठेवले. त्यानंतर त्यांनी कॉलेजच्या आतमधील पटांगणात गाडी उभी केली आणि कॉलेजमध्ये कामासाठी गेले. काही वेळाने गाडीकडे परतल्यावर त्यांनी पाहिले की कंडक्टर साईडचा काच फोडलेला आहे. ड्रॉवरमध्ये ठेवलेली पैसे ठेवलेली थैली गायब असल्याचे दिसल्यावर त्यांनी कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोन इसम काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर येऊन गाडीची काच फोडून पैसे घेतांना दिसले. या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन परतवाडा येथे अप. क्र. 669/2025 कलम 303(2), 3(5) भा.न्या.सा. प्रमाणे गुन्हा नोंद झाला. पोलीस अधीक्षक अमरावती यांनी अशा गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून आरोपींचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस स्टेशन परतवाडा येथील डि.बी. पथकाने घटनास्थळ आणि मुख्य रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन्ही आरोपी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून अंजनगाव-अकोटकडे जात असल्याचे दिसले.तपासादरम्यान, 10 ऑक्टोबर 2025 रोजी खामगाव येथे बँक परिसरात लोकांवर पाळत ठेवणारे दोन इसम फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, डि.बी. पथकाने संयुक्त कारवाई करून आरोपी विशाल सिंह प्रमोद कुमार (वय 40, रा. शहीद नगर नं. 3, पो. स्टे. सदर बाजार, जि. आगरा, उत्तर प्रदेश) आणि बुद्धेश्वर उमाशंकर करवाल (वय 38, रा. राजगढ, ता. मळीहान, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) यांना बुलढाणा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक मोटारसायकल (MH 02 DX 9119), रोकड ₹50,000, तीन मोबाईल (दोन अँड्रॉईड, एक साधा – ₹21,000), नगद ₹18,000, काळा हेल्मेट ₹2,000, एक शर्ट पाकीट व प्लास्टिक गुल्लर ₹100 असा एकूण ₹91,100 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी 4–5 महिन्यांपूर्वी परतवाडा गुजरी बाजार परिसरात मोपेडच्या डिक्कीतून पैसे काढल्याची कबुली दिली. त्यांनी पोलीस स्टेशन परतवाडा येथे दोन गुन्ह्यांची कबुली दिल्यामुळे अप. क्र. 669/2025 (कलम 303(2), 3(5) भा.न्या.सा.) व अप. क्र. 289/2025 (कलम 303(2) भा.न्या.सा.) प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले. दोन्ही आरोपींवर यापूर्वी संभाजीनगर आणि बॅगलोर येथे गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली असून, ते रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत आणि देशभरात विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची शक्यता आहे.पोलीस ठाण्याने सर्व नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे, बँकेतून पैसे काढल्यानंतर पैशांची बॅग सोडू नये आणि कोणीतरी पाठलाग करत असल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, सहायक पोलीस अधीक्षक (उपविभाग अचलपूर) डॉ. शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के (ठाणेदार परतवाडा), स.पो.नि. संजय अत्राम, पो.हे.कॉ. सचिन होले, सुधीर राऊत, पो.कॉ. विवेक ठाकरे, घनश्याम किरोले, शुभम शर्मा, जितेश बाबील, पो.कॉ. सचिन कोकणे, विराज ठाकुर आणि पियुष वानखडे यांनी केली.




