11 वर्षीय चिमुरडीवर पाशवी अत्याचार
खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

23 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दर्यापूर /23 जानेवारी : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, एका 23 वर्षांच्या नराधमाने नात्यातील ओळखीचा फायदा घेत 11 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर पाशवी अत्याचार केला. बेंबळा बुद्रुक गावाजवळच्या चंद्रभागा नदीकाठी ही घटना घडली असून, पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून खल्लार पोलिसांनी नराधम आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण विदर्भात संतापाची लाट उसळली असून, नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. विदर्भातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील रहिवासी असलेला आरोपी अकलेस उर्फ अनिल मुन्ना दारसिंबे याने ही नीच कृती केली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी आसेगावहून आपल्या घरी बेंबळा बुद्रुकला जाण्यासाठी आरोपीच्या दुचाकीवर बसली होती. ओळखीचा असल्याने मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला, पण वाटेतच नराधमाच्या मनात पाप आले. चंद्रभागा नदीच्या पात्राजवळ निर्जन जागा पाहून त्याने गाडी थांबवली आणि त्या चिमुरडीला ओढत मोकळ्या जागेत नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने पाशवी अत्याचार केला. या घटनेमुळे ती निरागस मुलगी पूर्णपणे हादरून गेली होती. तिने रडत रडत घरी पोहोचून आपल्या आई-वडिलांना ही आपबिती सांगितली. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना ऐकताच पालकांनी तातडीने खल्लार पोलीस स्टेशन गाठले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रभारी ठाणेदार प्रमोद राऊत यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि नराधम आरोपीला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
तपास आणि कारवाईचे सत्र-खल्लार पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. प्रभारी ठाणेदार प्रमोद राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस चमू घटनेच्या ठिकाणचा पंचनामा आणि तांत्रिक पुरावे गोळा करत असून, आरोपीला कठोर शासन व्हावे यासाठी कायदेशीर प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे.




