अमरावतीतून ऑटो रिक्षा चोरून नागपुरात विक्री

आरोपीला अटक, गुन्हे शाखा-1 ची कारवाई

अमरावती /29 जुलै : अमरावती शहरातून दोन ऑटो रिक्षा चोरी करून नागपुरात विकणार्‍या एका कुख्यात चोरट्याला अखेर नागपुरातून अटक करण्यात आली आहे. या आरोपीविरुद्ध नागपुरी गेट पोलीस ठाण्यात दोन चोरीचे गुन्हे दाखल होते. या दोन्ही प्रकरणांचा समांतर तपास करत गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथील बडा ताजबाग परिसरातून शेख राजा शेख बाबा (वय 21) या आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने अमरावतीतील दोन्ही ऑटो चोरी केल्याची कबुली दिली असून, ते ऑटो रिक्षा नागपुरात नेऊन विकल्याचे उघड झाले आहे. चोरी केल्यानंतर आरोपीने दोन्ही ऑटो नागपूरमध्ये सेकंड हँड वाहनांच्या बाजारात विकल्याचे सांगितले. पोलिसांकडून आता त्याच्या नागपूरमधील संपर्कांची चौकशी सुरू असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता आहे. आरोपीला अमरावतीत आणून पुढील कार्यवाहीसाठी नागपुरी गेट पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
शहरातील दोन वेगवेगळ्या भागातून रात्रीच्या वेळेस ऑटो चोरीची प्रकरणे समोर आली होती. वाहन चोरी प्रकरणांचा बारकाईने तपास करत गुन्हे शाखेच्या युनिट-1 च्या पथकाने आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यानुसार एका विशेष मोहिमेअंतर्गत नागपूरमध्ये जाऊन पोलिसांनी त्याला अटक केली. या मोहिमेचे नेतृत्व गुन्हे शाखा युनिट-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनीष वाघोले, इमरान नाईकवडे, पोहेकाँ फिरोज खान, सतीश देशमुख, सचिन बहाले, प्रशांत मोहोड, नापोकाँ नाजीमुद्दीन सय्यद, विकास गुडधे, सचिन भोयर, पोकाँ सूरज चव्हाण, निखिल गेडाम, रणजित गावंडे, चालक पोहेकाँ अलीमुद्दीन खतीब, पोकाँ किशोर खेंगरे व अशोक खंगार यांनी मोलाची भूमिका बजावली.

संबंधित बातम्या

Back to top button