अमरावती देशात अव्वल! स्वच्छ वायु सर्वेक्षणात भरारी

दिल्लीत 75 लाखांचा पूरस्कार प्रदान

-मनपाच्या पर्यावरणपूरक धोरणामुळे यश
-नागरिकांचाही सक्रिय सहभाग
अमरावती / 9 सप्टेंबर : स्वच्छ वायु सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहराने देशातील इतर सर्व शहरांना मागे टाकत पहिले पारितोषिक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण अमरावती टीमचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम 2025 अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अमरावती शहराने द्वितीय श्रेणी (3 ते 10 लाख लोकसंख्या असलेली शहरे) मध्ये 200 पैकी 200 गुण मिळवून देशात अव्वल स्थान मिळवले. या यशाबद्दल अमरावतीला 75 लाखांचे रोख पारितोषिकही प्रदान करण्यात आले.
हा पुरस्कार 9 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वीकारला गेला. अमरावती महानगरपालिकेचे सातत्यपूर्ण प्रयत्न, कर्मचार्‍यांचे अथक परिश्रम, नागरिकांचे सक्रिय सहकार्य आणि पर्यावरणपूरक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी यामुळेच हे यश शक्य झाले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण, रस्ते धूळमुक्त ठेवण्याचे उपक्रम, वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर, आणि औद्योगिक भागात प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.
-ही अमरावतीकरांची सामुहिक उपलब्धी
स्वच्छ वायु सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावतीने देशात पहिले पारितोषिक पटकावणे हे संपूर्ण शहरासाठी गौरवाचे आहे. ही केवळ महानगरपालिकेची नाही, तर अमरावतीतील प्रत्येक नागरिकाची सामूहिक उपलब्धी आहे. मनपा कर्मचार्‍यांचे, अभियंत्यांचे, पर्यावरण तज्ज्ञांचे आणि नागरिकांचे योगदान अमूल्य आहे. हे पारितोषिक आम्हाला अधिक प्रेरणा देणार असून, भविष्यातील पर्यावरणपूरक धोरणे अधिक बळकटपणे राबवण्याचा आमचा संकल्प आहे.
-सौम्या शर्मा चांडक, आयुक्त, मनपा

संबंधित बातम्या

Back to top button