पुरवणी बजेटमध्ये अमरावती सुपरला अधिकाधिक निधी मिळावा
आ. संजय खोडके यांची अधिवेशनात मागणी

-अतिविशिष्ट डॉक्टरांना मिळणार वाढीव मानधन
-म. फुले योजनेचा 100 टक्के निधी पुनर्रचित करा
-आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
अमरावती : राज्यात नाशिक व अमरावती या दोन ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु असून अमरावती येथे वर्ष 2010 पासून रुग्णालयाचे काम चांगल्या रीतीने सुरु आहे. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये 7 युनिट आहेत तर नाशिक मध्ये केवळ तीनच युनिट चालविण्यात येतात. तरीपण शासनाकडून निधीचे संदर्भात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी निधीचे वाटप होत असतांना अमरावतीच्या सुपरसाठी तुलनात्मकदृष्ट्या कमी निधी मिळतो. वर्ष 2025-26 च्या पुरवणी मागणीत सुपर हॉस्पिटलसाठी 139 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी अधिकाधिक निधी देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य आ. संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनातून केली आहे.
आज विधान परिषदेतील कामकाजा दरम्यान पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना संजय खोडके यांनी ही मागणी केली. सभागृहात बोलतांना आ. संजय खोडके यांनी अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील प्रभावी तत्पर रुग्णसेवा, डॉक्टरांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सभागृहाला अवगत केले. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फेज-1 आणि फेज-2 मध्ये विविध आजारांवर उपचार करण्यात येतात. येथे युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी अशा हजारो शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाल्या आहेत. बालरोग विभागामध्ये 28,288 पेडीडियाट्रिक्स सर्जरी, किडनी प्रत्यारोपणाच्या 50 शस्त्रक्रियाही पार पडल्या. डायलिसिस सेवा 24 तास सुरु आहे. 10 हजार डायलिसिस करण्यात आल्या आहेत. सुपरच्या टप्पा-दोन मध्ये कोरोना काळापासून हृदयरोग विभाग सुरु करण्यात आला असून 1,367 अँजिओग्राफी, 589 अँजिओप्लास्टी, 2 डीइको 9,575 करण्यात आल्या आहेत. आयसीयू सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती खोडके यांनी दिली.
तसेच वर्ष 2023 पासून न्यूरॉलॉजी युनिट सुरु करण्यात आले असून 531 न्यूरोसर्जरी करण्यात आल्या. त्याचबरोबर कँसर युनिट मध्ये ऑन्कोलॉजी विभागामध्ये 3,391 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. केमोथेरपी सेवेचा 1,486 रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. राज्यात कुठेच नसेल इतक्या चांगल्या तर्हेने अमरावती येथील शासकीय रुग्णालय अर्थातच सुपर स्पेशालिटी येथे रुग्ण व आरोग्यसेवेचे काम सुरु आहे. मात्र शासनाकडून निधीचे वाटप होत असतांना अमरावती व नाशिककरिता एकत्रित बजेट करून निधी दिला जातो. ज्यामध्ये नाशिक येथे केवळ तीनच विभाग सुरु असतांना अमरावती पेक्षा अधिक निधी मिळतो. तर अमरावती येथे सात युनिट कार्यरत असतांना निधी कमी मिळतो. याकडे खोडके यांनी लक्ष वेधले.
यावर्षीच्या पुरवणी मागणीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करिता 139 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणून निधी देतांना अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करिता बजेट मध्ये स्वतंत्र प्रावधान करून अधिकाधिक निधी देण्याची मागणी आ. संजय खोडके यांनी सभागृहातून केली. त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यासाठी तज्ज्ञ व नामांकित शल्यचिकित्सकांना सेवाभावी तत्वावर बोलावण्यात येते. मात्र सुपरमध्ये अतिविशिष्ट सेवा देणार्या डॉक्टरांचे मानधन सुद्धा प्रलंबित असते. त्या डॉक्टरांना मानधन देण्यासंदर्भात शासनाची एक वर्गवारी आहे. ज्यामध्ये मायनर साठी 3 हजार, मेजर साठी 5 हजार व सुपर मेजरसाठी 5 हजार रुपये मानधन मिळते. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अतिविशिष्ट सेवा देणार्या डॉक्टरच्या मानधन वाढ संदर्भात शासनाने प्रस्तावित केले आहे. ज्यामध्ये मायनरसाठी 5 हजार, मेजरसाठी 10 आणि सुपर मेजरसाठी 25 हजार एवढे वाढीव मानधन प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे या संदर्भातील पैसे कधी रिलीज करणार असा प्रश्न आमदार -संजय खोडके यांनी यावेळी उपस्थित केला.
सुपर मधील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना शासनाच्या वतीने राबविली जात असून यामधून मिळणारे अनुदानाची वर्गवारी करण्यात येते. 52 टक्के निधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला दिला जातो. तर 23 टक्के निधी शासनाच्या परवानगीने इतर सुविधांसाठी उपलब्ध करण्यात येतो. तसेच 25 टक्के निधी शासनाला जातो. याउलट महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन खासगी रुग्णालयाला सर्व 100 टक्के अनुदान रिलीज करण्यात येते. त्याचप्रमाणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ला सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा 100 टक्के निधी रिलीज करण्यासंदर्भात पुनर्रचना करण्यात यावी. अशी मागणी सुद्धा आ.संजय खोडके यांनी केली आहे.
यावर उत्तर देतांना राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सभागृहात सांगितले कि, सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने आगामी काळात निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मधील अतिविशिष्ठ सेवा देणार्या डॉक्टरच्या वाढीव मानधनासंदर्भात मुख्यमंत्री महोदय व आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन त्याबाबतच्या सूचना देण्यात येईल. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा 100 टक्के निधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ला देण्यासंदर्भात आगामी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेणार असल्याचे उत्तर मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सभागृहासमक्ष दिले.




