अमरावती रेल्वे स्टेशन बंद होणार? अफवा उडाली
प्रशासनाने दिला खुलासा, माहिती चुकीची

-गाड्यांचे अवागमन सुरूच राहणार
-डीसीपी आणि स्टेशन मास्टर यांचे स्पष्टीकरण
अमरावती / 2 सप्टेंबर : शहरात आज सकाळपासूनच अमरावती रेल्वे स्टेशन बंद होणार असल्याच्या अफवांमुळे संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला होता. राजकमल चौकावरील क्षत्रिग्रस्त उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर ही अफवा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली.
रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात स्पष्ट केले की ही बातमी खोटी आहे. स्टेशन मास्टर महेंद्र लोहकरे यांनी दैनिक मातृभूमीशी बोलताना सांगितले, अमरावतीचे मॉडेल रेल्वे स्थानक सध्या बंद करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. फक्त उड्डाणपूल बंद झाल्याची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. रेल्वे मार्गावर गाड्यांचे आवागमन नेहमीप्रमाणे सुरू राहील. रेल्वे सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी डीसीपी रमेश धुमाळ यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून उड्डाणपूलाखाली रेल्वे गाड्या उभ्या न ठेवण्याचा सल्ला दिला होता. स्टेशन मास्टर लोहकरे यांनी सांगितले की, या पत्रामुळे गाड्यांची वाहतूक थांबत नाही आणि स्थानक पूर्णपणे बंद होणार नाही.
राजकमल चौकातील उड्डाणपूल पूर्णतः क्षत्रिग्रस्त झाल्याने तो सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधी नवीन उड्डाणपूलाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना वाहतुकीतील कोंडीचा सामना करताना नवीन पुलाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, काही ऑटो चालकांनी पूल बंद असल्यामुळे व्यवसायावर होणार्या परिणामाची तक्रार करत रेल्वे स्थानक पूर्ण बंद करण्याची मागणी केली होती, तसेच उड्डाणपूल पाडून रेल्वे क्रॉसिंग देऊन रस्ता तयार करण्याची मागणीही केली होती. मात्र प्रशासनाने सध्या ही मागणी व्यवहार्य नाही असे सांगितले आहे.




