1 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार अमरावती-मुंबई विमानसेवा

1 ऑगस्टपासून उड्डाणे ठप्प

-नागरिक त्रस्त – प्रतिनिधींवर संताप
-दीव व हैद्राबाद फेर्‍यांना प्राधान्य
अमरावती / 28 ऑगस्ट : 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली अमरावती-मुंबई हवाई सेवा 21 ऑगस्टपासून ठप्प आहे. मात्र, अलायन्स एअर कंपनीने आज अधिकृतरीत्या जाहीर केले की येत्या 1 सप्टेंबरपासून आठवड्यातील तिन्ही दिवशी अमरावती-मुंबई उड्डाणे नियमित सुरू होतील.
अलायन्स एअरने 22, 25 व 27 ऑगस्टच्या उड्डाणांना ‘ऑपरेशनल इश्यू’ कारण पुढे करून रद्द केले. कंपनीने एअरपोर्ट प्राधिकरणाला लिखित स्वरूपात 31 ऑगस्टपर्यंत उड्डाणे थांबविण्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे कंपनीकडे 20 विमानांचा ताफा असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 4 विमानं कार्यरत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हवाई सेवा सुरळीत ठेवण्यात कंपनी अपयशी ठरत असल्याची चर्चा आहे.
असेही दिसून आले की अलायन्स एअरचे विमान आधी मुंबई-दीव किंवा मुंबई-हैदराबाद मार्गावर धावते व नंतरच अमरावतीसाठी उड्डाण करते. त्यामुळे हवामान बिघडल्यास किंवा विलंब झाल्यास अमरावतीत नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने ते उड्डाण थेट रद्द केले जाते. या पार्श्वभूमीवर 21 ते 31 ऑगस्टदरम्यान अमरावती-मुंबई हवाई सेवा संपूर्ण बंद ठेवण्यात आली. हवाई प्रवासावर अवलंबून असलेल्या व्यावसायिक, विद्यार्थी, तसेच उपचारासाठी मुंबई गाठणार्‍या रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तिकीट आधीच बुक करून ठेवलेले प्रवासी रिफंड प्रक्रियेमुळे त्रस्त झाले आहेत.
स्थानिक जनप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नावर एकदाही आवाज उठवला नाही, याबाबत शहरात संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही जनतेचा रोष स्पष्टपणे उमटत आहे. एअरपोर्ट प्राधिकरण: एमएडीसीचे अधिकारी गौरव उपश्याम यांनी सांगितले की, कंपनीने रद्द झालेल्या उड्डाणांची पूर्वसूचना दिली होती. मात्र कारणांचे तपशील त्यांच्याही माहितीत नाहीत. अलायन्स एअर व्यवस्थापक राजकुमार पटेल यांनी सांगितले की, ऑपरेशनल कारणांमुळे तीन उड्डाणे रद्द झाली होती. प्रवाशांना संपूर्ण रक्कम परत केली आहे. 1 सप्टेंबरपासून अमरावती-मुंबई उड्डाणे नियमित होतील.

संबंधित बातम्या

Back to top button