अमरावती देशातील सर्वाधिक उष्ण शहर
विदर्भात आगामी काळात वादळी पावसाचा अंदाज

42.2 शहर पेटले
अमरावती/12 मार्च – राज्यात जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानाचा पारा चढलेला बघायला मिळतोय. अनेक शहरांमध्ये उन्हामुळे सर्वसामान्यांची लाही-लाही होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे, नंदूरबार यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड कडाक्याचं ऊन पडताना दिसत आहे. हीच परिस्थिती विदर्भात देखील आहे. विशेष म्हणजे अमरावती हे देशातील सर्वात उष्ण शहर असल्याची नोंद झाली आहे.
त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाच्या तीव्र झळा बघायला मिळत आहे. मार्च महिन्यातच अशी अवस्था असेल तर एप्रिल आणि मे महिन्यात किती ऊन पडेल? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या दरम्यान हवामान विभागाने आगामी काळात विदर्भात वादळी पावसाचा देखील अंदाज वर्तवला आहे. यंदा मार्च महिन्यातच विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो आहे. गुरूवारी (12 मार्च) अमरावती येथे 42.2 अंश तर अकोला येथे 42 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती हे गुरुवारी देशातील सर्वाधिक तर जगभरातील 15 व्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. यातील अमरावती आणि अकोला या दोन्ही शहरांमध्ये सरासरीपेक्षा अनुक्रमे 6.8 आणि 5.3 अंशांनी अधिक तापमान नोंदविले गेले असल्याने येथे उष्णतेची लाट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमानात मोठी वाढ झाली आहे. यात ब्रह्मपुरी येथे 40.8, चंद्रपूर आणि वर्धा येथे प्रत्येकी 40.2 अंश तर यवतमाळ येथे 40 इतके तापमान होते. त्यामुळे विदर्भातील 11 पैकी निम्म्याहून अधिक जिल्ह्यांत तापमान 40 अंशांपेक्षा अधिक होते. याखेरीज नागपूरमध्ये 39 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा 3 ते 5 अंशांनी अधिक असल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. भंडारा आणि गोंदिया येथे तुलनेने सगळ्यात कमी प्रत्येकी 38 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. फेब्रुवारीअखेर झालेल्या अवकाळी पावसानंतर काही दिवस गारवा होता; मात्र मार्च सुरू होताच वातावरण कोरडे झाले आहे.




