देशातील 74 प्रजातींचा खजिना अमरावतीत…

अमरावतीच्या वडाळी वनपरिक्षेत्रातील बांबू उद्यान

निसर्ग, संवर्धन आणि संभाव्य उद्योगांचा विराट प्रवास

अमरावती /14 नोव्हेंबर – वडाळी वनपरिक्षेत्रात विकसित केलेले बांबू उद्यान आज संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे. जवळपास 125 एकरांवर पसरलेल्या या उद्यानात बांबूच्या तब्बल 74 प्रजातींचे जतन आणि संवर्धन केले जाते. देशभरात कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात बांबू प्रजाती एकाच ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे अमरावतीचे हे उद्यान निसर्गप्रेमी, संशोधक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरले आहे. उद्यानात देशातील तसेच विदेशातून आणलेल्या बांबू प्रजातींचाही समावेश आहे. उद्यानात प्रवेश करताच हिरवीगार झाडी, उंच-उंच वाढलेले बांबू, तर कधी भुईजवळ पसरलेल्या प्रजाती अशी विविधता दिसून येते. बांबूच्या पानांची सळसळ, दाट सावली आणि शांत वातावरणामुळे उद्यानात फेरफटका मारताना पर्यटकांना निसर्गाशी एक वेगळाच संवाद साधता येतो.
या उद्यानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथे एकाच जागी बांबूंचे वैविध्य पाहायला मिळते. काही बांबू अतिशय उंच वाढतात, तर काही प्रजातींची पाने जाड असतात. काही प्रजाती अर्थकारणासाठी उपयुक्त तर काही केवळ शोभेच्या दृष्टीने लावल्या जातात. काही प्रजातींचे कोंब खाद्य म्हणूनही वापरले जातात. सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी सय्यद सलीम यांच्या मते काही बांबू प्रजातींच्या मुळांपासून अचार तयार करता येतो, तर काही बांबूंमधून तंतू काढून कापड तयार केले जाते. जगभरात बांबूचा वापर फर्निचर, कागद, घरगुती वस्तू, सजावटी साहित्य, कपडे आणि अनेक प्रकारच्या हस्तकलेत केला जातो. वडाळीमधील प्रजातींची विविधता पाहता अशा उद्योगांची मोठ्या प्रमाणात उभारणी होऊ शकते. कृषीक्षेत्रातही बांबूची लागवड हा दीर्घकालीन उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो. बांबू एकदा लावला की अनेक वर्षे सतत उत्पादन देतो. पाण्याची आणि खतांची कमी गरज, वाढती बाजारपेठ आणि टिकाऊपणा या गुणांमुळे बांबूला शेतीत मोठे महत्त्व आहे. पण वडाळी वनपरिक्षेत्रात शेतकर्‍यांना बांबू लागवडीकडे वळवण्यासाठी पुरेसे मार्गदर्शन किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले नसल्याने या दिशेने मोठी प्रगती झालेली दिसत नाही. प्रजाती वाढवणे आणि उद्यान विकसित करणे यावर भर राहिला असला, तरी या सर्व ज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ शेतकर्‍यांना मिळावा यासाठी आवश्यक पावले उचलली गेली नाहीत. उद्यानात पर्यटकांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. 2023-24 या वर्षात उद्यानात 1,43,365 पर्यटकांनी भेट दिली आणि सुमारे 29 लाख 72 हजारांचे उत्पन्न झाले. पुढील वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये पर्यटकसंख्या 1,60,549 वर पोहोचली आणि उत्पन्न तब्बल 48 लाखांवर गेले. यातून उद्यानाची लोकप्रियता वाढल्याचे स्पष्ट होते. वाढत्या पर्यटकांमुळे स्थानिक क्षेत्रातील व्यवसायांनाही चालना मिळत आहे.अमरावती जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रजाती असूनही या प्रजातींचा उपयोग करून लघुउद्योग सुरू करण्यासाठी पुरेशी पावले उचलली गेली नाहीत. चंद्रपूरसारख्या ठिकाणी बांबू प्रजाती कमी असूनही तेथे बांबूप्रक्रिया, बांबू हस्तकला आणि उद्योग प्रशिक्षणाची व्यवस्था उत्तम प्रकारे केली जाते. या प्रशिक्षणांमुळे स्थानिकांना रोजगार मिळतो आणि परिसराचा विकास होतो. परंतु वडाळीमधील उद्यानात एवढा मोठा संग्रह असूनही बांबूच्या वस्तू बनवणे, प्रक्रिया करणे किंवा उद्योग सुरू करणे यांना प्रोत्साहन देणारी यंत्रणा कमी असल्याचे दिसून येते. योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले तर बांबूच्या आधारे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
वडाळीचे बांबू उद्यान हे अमरावतीसाठी एक मोठा नैसर्गिक खजिना आहे. पर्यावरण संवर्धन, पर्यटन, कृषी विकास आणि ग्रामीण उद्योग यांच्या दृष्टीने ही जागा भविष्यात महत्वाची ठरू शकते. उद्यानातून मिळणार्‍या ज्ञानाचा फायदा स्थानिक शेतकरी, युवक आणि महिला यांना होण्यासाठी प्रयत्न वाढवण्याची गरज आहे. बांबू प्रजातींच्या विविधतेचा अभ्यास, त्यावर आधारित उत्पादननिर्मिती आणि बाजारपेठ निर्माण करण्याची संधी मोठ्या प्रमाणात आहे. ही संधी योग्य पद्धतीने वापरली तर वडाळीचे बांबू उद्यान केवळ एक पर्यटनस्थळ राहणार नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे केंद्र म्हणून पुढे येऊ शकते.
बांबू प्रजातींचा मोठा संग्रह …
उद्यानात फिरताना वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे आणि उंचीचे बांबू पाहायला मिळतात. काही बांबू अगदी उंच वाढलेले तर काही जमिनीच्या जवळ राहणारे दिसतात. काहींची पाने बारीक तर काहींची जाड. काही अतिशय सरळ वाढणारे तर काही वाकडे-तिकडे. अशा पद्धतीने उद्यानात चालताना प्रत्येक काही पावलांनी एक वेगळी बांबू प्रजाती भेटते. देशात इतर कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात प्रजाती एकत्रित दिसत नाहीत. त्यामुळे हे उद्यान राज्यातीलच नव्हे तर देशातील निसर्गप्रेमींना आकर्षित करणारे ठिकाण ठरले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button