अमरावती शहरावर आता लवकरच सीसीटीव्ही कॅमेरांची नजर
सरकारकडून 118 कोटींचा निधी मंजूर

-पोलिस आयुक्त चावरियांची माहिती
अमरावती / 4 जून: अमरावती शहरावर आता लवकरच सीसीटीव्ही कॅमेरांची नजर राहणार आहे. अमरावती पोलिस आयुक्तालयाने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी दिलेला प्रस्ताव राज्य सरकारच्या गृह खात्याने मंजूर केला आहे. अमरावती पोलिस आयुक्तालयाला शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी 118 कोटींचा निधी देण्याचे सरकारने मान्य केले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती अमरावतीचे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिली.
आज पोलिस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत अरविंद चावरिया बोलत होते. आजच्या बदलत्या काळात गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाची भूमिका बजावतात. अमरावती शहराचा होत असलेला विस्तार आणि गुन्ह्यांचे बदललेले स्वरुप पाहता, येथेही गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव पोलिस आयुक्तालयाच्यावतीने राज्य सरकारच्या गृह खात्याला देण्यात आला होता. सरकारच्या एका समितीकडे तो विचाराधीन होता. समितीने दिलेल्या अहवालानंतर अमरावतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव मान्य करुन सरकारने त्यासाठी 118 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले.
अमरावती शहरातील सर्व प्रमुख चौक, प्रमुख रस्ते, बाजारपेठा, वर्दळीची ठिकाणे येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावून पोलिस आयुक्तालयात त्यांचे नियंत्रण राहणार आहे. येत्या काही दिवसांत कॅमेरे लावण्याचे काम प्रत्यक्ष सुरु होईल आणि काही महिन्यांतच हे काम पूर्ण होवून अमरावती शहर सीसीटीव्ही कॅमेरांच्या निगराणीखाली येणार आहे. कॅमेरांमुळे अमरावती शहरातील लहान मोठे गुन्हे, गैरप्रकार यावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठीही त्याची मोठी मदत होणार आहे. सोबतच गुन्ह्याच्या तपासातही सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास अरविंद चावरिया यांनी यावेळी व्यक्त केला.