अंबादेवी संगीत सेवा समारोह 21 पासून

पं.पणशीकर, रागेश्री दास, कुमार मरडूर व पुर्बायन चॅटर्जी यांची सादरीकरणे

अमरावती /17 नोव्हेंबर : श्री अंबादेवी संस्थानतर्फे भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेला अंबादेवी संगीत सेवा समारोह यंदा 19व्या वर्षात प्रवेश करीत असून, हा त्रिदिवसीय संगीत सोहळा 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान अंबादेवी कीर्तन सभागृहात होणार आहे. या विषयीची माहिती संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सचिव रवींद्र कर्वे, कोषाध्यक्ष विलास मराठे, दीपा खांडेकर, अ‍ॅड. राजेंद्र पांडे, सूर्यकांत कोल्हे, अशोक खंडेलवाल, सुरेंद्र बुरंगे उपस्थित होते. समारोहाचा शुभारंभ 21 नोव्हेंबर, शुक्रवार सायंकाळी होणार आहे. पहिल्या सत्रात पुण्याचे प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन सादर होईल. दुसर्‍या सत्रात रात्री 8.30 वाजता कोलकात्याच्या रागेश्री दास या टप्पा, कजरी, ठुमरी, दादरा या दुर्मीळ होत चाललेल्या गायनशैलींची प्रस्तुती करतील. दुसर्‍या दिवशी 22 नोव्हेंबर, शनिवार रोजी संध्याकाळी 6.30 वाजता धारवाडचे ख्यातनाम गायक पं. कुमार मरडूर यांचे सादरीकरण होणार आहे. रात्री 8.30 वाजता प्रख्यात सितारवादक पं. पुर्बायन चॅटर्जी यांचे वादन होईल. त्यांना तबल्यावर ओजस अढिया साथ देतील. दोघांची जुगलबंदी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.समारोपाच्या दिवशी 23 नोव्हेंबर, रविवार रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दक्षिण भारतातील प्रसिद्ध जुळ्या भगिनी रंजनी-गायत्री यांचे गायन सादर होणार आहे. अंतिम सत्रात रात्री 8.30 वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पं. अनिंदो चटर्जी आणि त्यांचे सुपुत्र अनुव्रत चटर्जी यांचे तबला सहवादन होणार आहे. या संगीत सेवेच्या परंपरेत पूर्वीही अनेक नामवंत कलाकारांनी सहभागी होत अमरावतीच्या रसिकांना अविस्मरणीय सादरीकरणे दिली आहेत. यात कौशिकी चक्रवर्ती, महेश काले, पं. व्यंकटेश कुमार, भाग्येश मराठे, संजीव अभ्यंकर, शोभा गुर्टू, मालिनी राजूरकर, उदय भवालकर, राजन-साजन मिश्रा, एन. राजम, त्यांच्या सुपुत्री-सुपौत्री, बुधादित्य मुखर्जी, रिंपा शिवा, रामदास पलसुले, नमन घोष, इशान घोष अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. अनेकांनी अत्यल्प मानधनात सेवा अर्पण करून हा समारंभ अधिक समृद्ध केला आहे. हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून, शास्त्रीय संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री अंबादेवी संस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button