शेंदूरजना बाजारातील श्री मारूती देवस्थानात अनियमिततेचा आरोप

ग्रामस्थांची जिल्हाधिकार्‍यांकडे धाव

अमरावती /1 डिसेंबर : शेंदूरजना बाजार (ता. तिवसा) येथील ऐतिहासिक आणि लोकश्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री मारूती देवस्थानाच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता, आर्थिक अपारदर्शकता आणि अधिकारांचा दुरूपयोग होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील अनेक नागरिकांनी संयुक्तपणे जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार अर्ज दाखल करत सखोल चौकशी आणि संबंधित विश्वस्तांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीमुळे संपूर्ण परिसरात देवस्थान व्यवस्थापनाच्या कारभाराबद्दल नवी चर्चा रंगली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, देवस्थानाच्या कारभारात अनेक वर्षांपासून गैरव्यवहार सुरू असून, विश्वस्त मंडळावर लोकविश्वास राहिला नाही. देवस्थानाच्या मालमत्तेचा योग्य उपयोग न होणे, हिशोब सादर न करणे, अधिकाराचा गैरवापर आणि हितसंबंधांचे राजकारण या सर्व मुद्द्यांवर ग्रामस्थांनी थेट बोट ठेवले आहे. तक्रारीनुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमात देवस्थानाने दरवर्षी लेखापरीक्षण अहवाल सादर करणे बंधनकारक असतानाही हे अहवाल अनेक वर्षांपासून दाखल करण्यात आले नाहीत. ट्रस्टकडे नेमके किती उत्पन्न येते व कशाप्रकारे खर्च केले जाते याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
देवस्थानाच्या नावावर तब्बल 52 एकर शेती आणि इतर मालमत्ता असतानाही मंदिराची अवस्था दयनीय झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. इतक्या मोठ्या उत्पन्नक्षम मालमत्तेचा देवस्थानाच्या विकासासाठी उपयोग न होणे हा गंभीर दुर्लक्षाचा प्रकार असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मंदिरातील दुरुस्ती, स्वच्छता, सुविधा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. देवस्थानाच्या इमारतीत चालणारे सरकारी स्वस्त धान्य दुकान हे मल्टिपरपज सहकारी संस्थेकडे चालते. संस्थेचे सचिव आणि व्यवस्थापक हेच देवस्थानाचे विश्वस्त असल्याने हितसंबंधांचा संघर्ष निर्माण झाला आहे. दुकानाचे भाडे ट्रस्टकडे जमा न होत असल्याचा मोठा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे आर्थिक पारदर्शकतेवर अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सन 2021-22 मध्ये नियुक्त झालेल्या काही विश्वस्तांकडे गावातील दुसर्‍या देवस्थानाचेही विश्वस्तपद असल्याने ते श्री मारूती देवस्थानाच्या 52 एकर शेतीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तंटामुक्ती अध्यक्ष आणि माजी सरपंच मंडळात असल्याने त्यांनी पदाचा प्रभाव वापरून निर्णय त्यांच्याच फायद्यासाठी घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे देवस्थानाचे सर्व हिशोब व नोंदी तातडीने मागवून सखोल चौकशी करावी, दोषी विश्वस्तांवर कायदेशीर कारवाई करावी आणि परिस्थिती गंभीर असल्यास विद्यमान विश्वस्त मंडळ बरखास्त करून अंतरिम मंडळ नेमावे, अशी मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या मते, देवस्थान हा श्रद्धेचा विषय असून त्याच्या कारभारात राजकारण आणि स्वार्थाचा हस्तक्षेप होणे अक्षम्य आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून मंदिराचा कारभार पुन्हा पारदर्शक व नियमानुसार उभा करावा अशी मागणी निवेदनातून शाम शंकरराव भारती, योगेश प्रभाकर उंबरकर, योगेश विलास राजुरकर, रमेश नारायण जयस्वाल, दशरथ मा. नथिले, चेतन महीपालसिंह ठाकूर, विशाल महिपालसिंह ठाकूर, सुनिल मानिकराव लोखंडे, माणीक बंडोराव लोखंडे, दिवाकर रामराव दिवे, याकुब रहेमान शाहा, दिवाकर घुरडे श्याम भारती हरिणारायन जयस्वाल सुनील लोखंडे गजानन चौधरी राजेश चौधरी, अमोल उईके, सुरज कुरजेकर, सतीश वाघमारे, सुमित नाथीले, नंदू घुरडे, अक्षय कोडगले, मुकेश उईके, हेमंत घुरडे, अभिजित चौधरी यांनी केली आहे. अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याने आता प्रशासन पुढे कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने चौकशीच्या दिशेकडे सर्वांची उत्सुकता वाढली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button