बाबासाहेबांच्या अस्थींना ऑल इंडिया समता सैनिक दलाची मानवंदना
नया अकोला येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त

अमरावती /7 डिसेंबर : भारताचे संविधान शिल्पकार, परमपुज्य,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नया अकोला येथे आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन करण्यात आले. ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील ऑल इंडिया समता सैनिक दल मोठ्या उत्साहाने व शिस्तबद्ध पथसंचलनासह मानवंदना देण्यासाठी हजर झाले होते. कालकतिथ आंबेडकरी नेते, बंडखोर सतीशदादा इंगोले यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या माध्यमातून शनिवारी मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक पँथर हरिदास शिरसाठ आणि पँथर प्रभाकर शेंडे होते. समता सैनिक दलाचे कमांडर ऑफिसर प्रेमकुमार खिराडे, तसेच समता सैनिक दल जिल्हा संयोजिका आशा इंगळे यांचे विशेष मार्गदर्शनात मानवंदना कार्यक्रम पार पडला.
समता सैनिक दलाच्या विविध शाखांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यात शाखा घोडगाव, राजना, पथोर्ट, बोरगाव पेठ, टवलार, बोर्डी, कोल्हा, वणी, बेलखेडा, कोंडवर्धा, काजळी, मधान, देऊरवाडा, देवरा, पुजदा, माटरगाव आणि कविटा यांचा समावेश होता. सर्व सेक्शन लीडर्स, मार्शल तसेच उपासक-उपासिका यांनी शिस्तबद्ध पथसंचलनातून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करून सामाजिक जागृतीचा संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान समता, बंधुता, न्याय आणि मानवतेचे विचार जागृत ठेवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. बाबासाहेबांच्या शिक्षण, विचार आणि आदर्शांचे दर्शन घडवणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.




