अमित उपाध्याय हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोश

चांदुर रेल्वे तालुक्यातील घटना

-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
अमरावती / 19 जून: चांदुर रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथे सुमारे अडिच वर्षांपूर्वी घडलेल्या खळबळजनक व बहूचर्चित अमित उपाध्याय हत्याकांडातील सर्व आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोश मुक्तता केली आहे. न्यायालय क्रमांक 3 चे न्यायमूर्ती एच. एल. मनवर यांनी या प्रकरणात निकाला दिला. आरोपी शंकर मारोती नेवारे आणि त्याची दोन मुले पियुष शंकर नेवारे आणि गौरव शंकर नेवारे यांना मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
20 डिसेंबर 2022 रोजी रात्री सातेफळ येथे ही घटना घडली होती. शंकर नेवारे, पियुष नेवारे व गौरव नेवारे यांनी अमित उपाध्याय याच्या डोक्यावर सिमेंटच्या फाळीने प्रहार करुन त्याची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मृतकाच आई चंदाबाई उपाध्याय यांच्या तक्रारीवरुन चांदुर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात पोलिसांनी घटनास्थळानजीक राहणार्‍या लोकांचे व प्रत्यक्षदर्शींचे बयाण नोंदविले होते. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती तेव्हा तपासातून समोर आली होती.
आरोपीच्यावतीने अ‍ॅड. अनिल विश्वकर्मा यांनी न्यायालयात बाजू मांडली. पोलिसांसमोर गावातील लोक आणि प्रत्यक्षदर्शींनी नोंदविलेले बयाण आणि प्रत्यक्ष न्यायालयात दिलेली साक्ष यात तफावत आढळून आली. त्यावरुन याप्रकरणात फिर्यादीद्वारे तक्रारीतून आरोपींवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आणि तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले. आरोपीच्या वतीने न्यायालयात अ‍ॅड. अनिल टी. विश्वकर्मा यांनी युक्तीवाद केला. त्यांना अ‍ॅड. नम्रता साहु, अ‍ॅड. ऋतुराज भोरे व अ‍ॅड. मनोज नरवाडे यांनी सहकार्य केले.

संबंधित बातम्या

Back to top button