निवृत्त सैनिकांकडूनच मिल्ट्री कँटीनमधील मद्याची तस्करी

एक्साईजने जप्त केली 9.93 लाखांची विदेशी दारु

-वेलकम पॉईंटजवळ भरारी पथकाची कारवाई
-दोघांना अटक, गुन्हा दाखल
अमरावती / 18 जुलै : भारतीय सैन्यातुन सेवानिवृत्त झालेल्या दोन माजी सैनिकांकडून मिल्ट्री कँटीन मधील विदेशी मद्याची अवैध वाहतूक केली जात असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वेलकम पॉईंटजवळ सापळा रचून 9.93 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवारी 16 जुलैच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. सेवानिवृत्त झालेल्या अनेक माजी सैनिकांच्या नावावर नागपूर येथील कँटीन मधून मद्याच्या बाटल्या घेऊन त्या चारचाकी वाहनाने अकोलापर्यंत विकण्याचा मोठा गोरखधंदा राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने उघडकीस आणला.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथील राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने नागपूर-अमरावती मार्गावरील वेलकम पॉईंटजवळ सुझुकी कंपनीची ब्रेझा क्र. एम.एच.30,ए झेड 6039 ही पांढर्‍या रंगाची चारचाकी थांबवून तपासणी केली असता, वाहनातील तीन टुरिस्ट बॅगमध्ये 750 मि.ली. क्षमतेच्या विविध कंंपन्यांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. या दारुच्या बाटल्या दुसर्‍या एका अज्ञात वाहनात स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
हे मद्य भारतीय सैन्याच्या कॅन्टीनमधून स्वतःच्या व इतर सेवानिवृत्त सैनिकांच्या कॅन्टीन कार्डवरून खरेदी करून त्याची अवैध वाहतूक केली जात होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी शांताराम हरी थाटे (वय 45, रा. गीतानगर, अकोला) आणि रामेश्वर जानोजी पुंडकर (वय 54, रा. संभाजीनगर, आकोट, जि. अकोला) हे दोघेही भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(अ) आणि 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत विदेशी मद्य, वाहन आणि बॅग यासह एकूण 8,97,316/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून खुल्या बाजारातील किंमत लक्षात घेतल्यास मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 9,93,400/- इतकी आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मुंबई येथील आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, प्रभारी विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर आणि अधीक्षक शशीकांत गर्जे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात प्रभारी निरीक्षक संतोष पी. वायाळ, सुभाष एस. खरे, आकाश जाधव, सादीक नौरंगाबादे, अंकुश काळे, आर. पी. मोकळकर, पी. आर. भोरे, सुजीत जाधव, विठ्ठल कस्टे, जगदीश जव्हाण, गजानन वाकोडे, के. एम. मातकर तसेच महिला कर्मचारी श्रीमती व्ही. बी. पारखी आणि कु. डी. डी. मानकर यांच्या संयुक्त पथकाने केली. पुढील तपास भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक संतोष पी. वायाळ हे करीत आहेत.
-वाहतूकीसाठी ‘आर्मी’ लिहिलेल्या वाहनाचा वापर
ज्या वाहनातून मद्य वाहतूक करण्यात येत होती त्या वाहनावर ‘आर्मी’ असे ठळक अक्षरात लिहिलेले होते. मद्याच्या तस्करीसाठी आरोपींकडून अधिकार्यांची दिशाभूल करण्यासाठी आणि नाकाबंदी व तपासणी दरम्यान संशय येऊ नये म्हणून ही शक्कल लढविण्यात आली होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला संशय आला आणि आरोपींचा प्रयत्न हानेन पाडला गेला.

संबंधित बातम्या

Back to top button