विमान अपघातातून अकोल्याची ऐेशर्या थोडक्यात बचावली

घटनेनंतर थरारक घटनेची वडील अमोल तोष्णीवाल यांना दिली माहिती

अकोला /13 जून: ‘म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात आला. अहमदाबाद विमानतळावरून ‘टेकऑफ’ केलेले विमान इमारतीवर कोसळले. या इमारतीमध्ये असलेली अकोल्याची ऐेशर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीतून ऐेशर्याने ब्लँकेट गुंडाळून स्वतःचा जीव मोठ्या धाडसाने वाचवला. या अपघातामुळे ऐेशर्याला मोठा धक्का बसला. अंगावर शहार आणणारा भयावह अनुभव आला असून तो जीवनात कधीही विसरू शकणार नाही, असे ऐेशर्या तोष्णीवाल हिने सांगितले. शहरातील दुर्गा चौक येथील रहिवासी ऐेशर्या तोष्णीवाल अहमदाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकते. गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथ डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसर्‍या वर्षात ती शिक्षण घेत आहे. ऐेशर्या एक दिवस अगोदरच आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात ऐेशर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. अहमदाबाद विमानतळावरून आकाशात झेपावलेले विमान काही अंतरावर जाऊन एका इमारतीवर कोसळले. या अपघाताच्यावेळी इमारतीतील वसतिगृहात अनेक विद्यार्थी होते. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ऐेशर्या तोष्णीवाल झोपलेली होती. अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी झाली. सर्वत्र आवाज, आगीचे लोळ अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीपुढे खचून न जाता ऐेशर्याने धीराने तोंड दिले. आगीमुळे कुठलीही ईजा होऊ नये म्हणून ऐेशर्याने स्वतः भोवती ब्लँकेट गुंडाळले. प्रचंड दाटलेल्या धुरातून वाट काढत तिने स्वतःचा जीव वाचवला. ऐेशर्याच्या चेहर्‍यावर, हातावर आणि पायावर भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. स्वतःचा जीव वाचवल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत ऐेशर्याने आपले वडील अमोल तोष्णीवाल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मुलीने घडलेली संपूर्ण माहिती सांगताच कुटुंब हादरून गेले. देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या अपघातातून बचावल्याची भावना तोष्णीवाल कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे

संबंधित बातम्या

Back to top button