चौरंगी लढतीने अचलपूर-परतवाडा शहर दणाणणार!
आखाडा नगरपालिकेचा, निवडणुकीचा जिल्हाभरात मोठा गाजावाजा

अचलपूर /16 नोव्हेंबर : अचलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा चार प्रमुख पक्षांकडून चार महिला उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीला अनोखी रंगत आली आहे. भाजप, काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष आणि शिवसेना उभाटा गट या चारही पक्षांनी महिला नेतृत्वावर विसंबून उमेदवारी जाहीर केली असून शहरात चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
काँग्रेसकडून नुरूस सहबा एतेशाम नबील यांची निवड झाल्यानंतर शहरभरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विशिष्ट समाजाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळू शकतो, असा अंदाज कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची अचलपूरमध्ये मजबूत पकड असून मागील पंचवार्षिकात काँग्रेसचे अनेक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसची भूमिका आणखी मजबूत होताना दिसत आहे. इतर समाजांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी काँग्रेसने घराघर संपर्क मोहीम, बैठका आणि गटबाजी रोखून एकसंघ पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. भाजपातर्फे रूपाली अभय माथणे यांना उमेदवारी मिळाल्यापासून त्यांच्या नावाभोवती वेगळे वातावरण तयार झाले आहे. तिकीट जाहीर होण्यापूर्वीपासूनच मथणे यांच्या नावाची शहरात चर्चा सुरू होती. चहाच्या टपर्यांपासून पानठेल्यांपर्यंत भाजपाचाच उमेदवार जिंकणार, असा दावा अनेक कार्यकर्त्यांतून केला जात होता. पक्ष संघटना, युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांनी मथणे यांच्यासाठी स्थानिक पातळीवर प्रचारयोजना आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या अलीकडील संघटन बांधणी आणि अचलपूरमधील वाढत्या मतदार संपर्कामुळे पार्टी आत्मविश्वासाने निवडणुकीत उतरली आहे. प्रहारकडून सारिका अनिल पिंपळे यांना संधी देण्यात आली आहे. त्या लोकप्रिय नेते अनिल पिंपळे यांच्या पत्नी असून, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा या मतदारसंघातील ठसा अजूनही मजबूत आहे. चार टर्म आमदार असलेल्या बच्चू कडूंचा अचलपूर शहरातील प्रभाव आजही टिकून असल्यामुळे प्रहारची दावेदारी दुर्लक्षित करता येणार नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. स्थानिक कार्यकर्ते, संघटन आणि युवा वर्ग प्रहारच्या बाजूने सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना उभाटा गटाकडून राधिका अरुण घोटकर या उमेदवार असून त्यांच्या नावाची चर्चा तिकीट जाहीर होण्यापूर्वीपासूनच होती. सामाजिक काम, गोरगरिबांना मदत, धार्मिक कार्यक्रम, नवरंग मंडळातील सक्रियतार्या सर्व माध्यमांतून अरुण घोटकर कुटुंबाची शहरात चांगली प्रतिमा आहे. यामुळे राधिका घोटकर यांना समाजाच्या विविध घटकांचा पाठिंबा मिळू शकतो. सुशिक्षित आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असून त्यांच्या प्रचाराला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिसत आहे. चारही पक्षांच्या महिला उमेदवारांनी मैदानात उतरल्यानंतर अचलपूरमध्ये निवडणूक वातावरण रंगले असून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाची स्वतंत्र ताकद, स्थानीक समाजातील प्रभाव, कार्यकर्त्यांची धडपड आणि जनमानसातील अपेक्षा-या सर्व गोष्टींचा या लढतीवर परिणाम होणार आहे. एकूणच, अचलपूर नगराध्यक्षपदासाठीची चौरंगी लढत प्रचंड चुरशीची ठरून शहरभर चर्चेचा विषय बनली आहे.




