अचलपूर ‘नपा’ भाजपचा झेंडा फडकवा

परतवाड्यात भाजपा प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

* भाजप कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी लोकप्रतिनिधींचे आवाहन

* रूपाली माथने यांच्या प्रचाराचा नारळ फुटला

* 38 पैकी 38 जागांवर विजयाचे लक्ष्य

परतवाडा / 23 नोव्हेंबर अचलपूर नगरपरिषद निवडणुकीची रणशिंगे वाजत असताना भाजपने आपल्या प्रचार मोहिमेला दमदार सुरुवात केली. गुरुवारी सायंकाळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रूपाली अभय माथने यांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास माजी खासदार आणि तीन आमदारांसह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते व शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती राहिली. उद्घाटन होताच परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला आणि निवडणूक वातावरण अधिक तापले.
उद्घाटनानंतर बोलताना रूपाली अभय माथने म्हणाल्या पक्षाचे नेतृत्व आणि मान्यवरांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहेच, पण खरा आत्मविश्वास मला परतवाडा- अचलपूरच्या जनतेकडून मिळतो. नागरिकांनी दाखवलेली साथ हेच माझ्या बळाचे मूळ आहे. नगरपरिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपचा अधिकृत वचननामा प्रकाशित करण्यात आला. यात शहरातील मूलभूत सुविधा, महिला आणि युवकांसाठी संधी, पाणीपुरवठा, स्वच्छता, आणि पायाभूत सुविधा उभारणीवर भर देण्यात आल्याची माहिती सामायिक करण्यात आली.
सभेला संबोधित करताना आमदार प्रवीण तायडे म्हणाले अचलपूर नगरपरिषदेतील 38 पैकी एकही जागा कमी पडणार नाही. सर्व 38 उमेदवार विजयी केल्यासच विकास नियोजन वेगाने होईल. नपा इमारत मंजूर असली तरी अनेक मोठे प्रकल्प नगरपरिषदेला अजून मिळवून द्यायचे आहेत. त्यासाठी भाजपा सत्ता गरजेची आहे. तायडे पुढे म्हणाले की, नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात आमदारांची उपस्थिती ही पहिलीच वेळ आहे आणि हा उत्साह जनतेच्या विश्वासामुळेच शक्य झाला आहे. यावेळी बोलताना माजी खासदार नवनीत राणा यांनी मतदारांशी आत्मीय संवाद साधताना म्हटले, या मतदारसंघात कठीण प्रसंगांना तोंड देत नागरिकांसाठी लढणारा नेता म्हणजे अभय माथने. जनतेचा विश्वास आणि पक्षाची ताकद आपल्याला पुन्हा विजयापर्यंत पोहोचवेल. कार्यकर्त्यांनी मनातील मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करणे हीच वेळेची गरज आहे. उद्घाटन कार्यक्रमाला माजी खासदार नवनीत राणा, प्रवीण पोटे, संजय कुटे, आमदार प्रवीण तायडे (अचलपूर), आमदार राजेश वानखेडे (तिवसा), आमदार केवलराम काळे (मेळघाट), माजी आमदार प्रभूदास भिलावेकर, महामंत्री गजानन महाकोळ्हे, अभय माथने यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाने भाजपची निवडणूक मोहीम अधिक वेगाने सुरू झाली असून, आगामी दिवसांत जनतेशी थेट संवाद साधत प्रचाराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. उद्घाटन प्रसंगी दिसलेला उत्साह पाहता अचलपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजप जोरदार लढत असून प्रबळ स्पर्धक म्हणून पुढे उभा राहत असल्याचे संकेत स्पष्ट दिसून आले.

संबंधित बातम्या

Back to top button