आरोपीला मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी
मोर्शी कृषी विभागातील लिपिकाच्या हत्या प्रकरणी

मोर्शी /26 ऑक्टोबर : चांदूर बाजार मार्गावरील तालुका कृषी विभागाच्या परिसरात लोखंडी बैलबंडी जवळ गुरुवारी रात्री सात वाजताच्या सुमारास कृषी विभागातील कार्यरत लिपिक विनोद राऊत यांची अज्ञात आरोपीकडून हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल आठवले आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले असता, विनोद राऊत यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे धनराज सुखदेव वानखडे (रा. ब्राह्मणवाडा, ता. चांदूर बाजार, हल्ली मुक्काम मोर्शी) याला गुरुवारी रात्रीच संशयित म्हणून ताब्यात घेतले. मृतक विनोद राऊत यांचा मुलगा तेजस राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी चौकशी केली असता, अटक केलेल्या आरोपीने गुन्हा कबूल केल्याने त्याच्यावर मोर्शी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवार, 24 ऑक्टोबर रोजी आरोपी धनराज वानखडे याला मोर्शी न्यायालयात न्यायमूर्ती खामतकर यांच्या समोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला मंगळवार, 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी धनराज वानखडे पोलीस कोठडीत असताना तो पोलिसांना काय माहिती देतो, याकडे मोर्शीकर जनतेचे लक्ष लागले आहे.




